बनावट सोने विकण्याचा प्रयत्न…! सराफाने आरोपींना कोंडून केले पोलिसांच्या स्वाधीन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : खोटी बिलं दाखवून बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चलाखीने बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत, दुकानाचे गेट लावून, पोलिसांना बोलावून घेऊन, आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही घटना बुधवारी राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे १३ ओमपान तसेच बोगस बिले व एक चारचाकी वाहन असा सुमारे ४ लाख १० हजार ५८० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत प्रशांत मुंडलिक यांचे सुरेश मुंडलिक सराफ व श्रद्धा ज्वेलर्स ही दोन ज्वेलर्सची दुकाने आहेत बुधवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर एमएच १२ केएन २१४९ मधून दोन व्यक्ती श्रद्धा ज्वेलर्स दुकानात आले व म्हणाले,

की आमच्याकडे सोन्याचे ओम पान व त्याची खरेदीची बिले आहेत. हे पान मोडायचे आहे, असे सांगून सोन्याचे पान देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यानंतर या व्यक्ती मुंडलिक यांच्या दुसऱ्या दुकानात गेले व तेथे त्यांच्या मुलाला याच प्रकारे बोलून व बिल दाखवून सोन्याचे पान मोडत असल्याचे सांगितले, हे सराफ व्यावसायिक प्रशांत मुंडलिक यांच्या सीसीटीव्हीद्वारे निदर्शनास आले.

आपल्या दुकानातून सोने मोडून गेलेले हेच व्यक्ती आहेत, ते पुन्हा दुसऱ्या दुकानात याच प्रकारे सोने मोडत आहेत, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने प्रशांत मुंडलिक त्यांनी लागेच त्या दुकानात धाव घेतली.

त्या आरोपींनी दिलेले ओम सोन्याचे पान गरम करून बघितले असता ते सोने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सराफ दुकानात खोटे सोने देऊन ते खरे आहे, असे भासवून खोटी बिले तयार करून संगणमताने आरोपी फसवणूक करत असल्याचा संशय त्यांना आला.

मुंडलिक यांनी संबंधित व्यक्तींकडे आधार कार्ड मागून त्यांना इतर प्रश्न विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. यामध्ये काहीतरी मोठा घोळ आहे, असे वाटताच मुंडलिक यांनी क्षणाचाही विलंब न करता अत्यंत चालाखीने या दोन व्यक्तींना बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत दुकानाचे गेट बाहेरून लावून घेतले व राहाता पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली.

त्यानंतर राहता पोलीस स्टेशनचे निरीक्षक सोपानराव काकडे यांनी घटनास्थळी पोलिसांना धाडले. सहाय्यक फौजदार दिलीप तुपे व सहकाऱ्यांनी या ठकसेनांना पोलीस स्टेशनला आणले. महावीर सतीशराव सगई (वय ३५, मूळ राहणार संभाजीनगर, पाथरूड, जिल्हा जालना, हल्ली राहणार रामनगर, ता. जि. जालना) व निवृत्ती रंगनाथ कोरधने (वय ५०, राहणार शिंदे काळेगाव, ता.जि. जालना) अशी आरोपींनी नावे सांगितली.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १३ बनावट सोन्याचे ओम पान, तसेच कित्येक बनावट दुकानाचे कोरे बिले, महावीर ज्वेलर्सचे व्हिजिटिंग कार्ड आढळून आले. बनावट ओमपान सोने व मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर असा एकूण ४ लाख १० हजार ५८० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

श्रद्धा प्रशांत मुंडलिक व पोपट भगिरथी महाले ज्वेलर्स यांचे मॅनेजर स्वप्निल नंदकिशोर सोनार यांची सुद्धा फसवणूक झाली. श्रद्धा प्रशांत मुंडलिक व पोपट भगीरथ महाले या सराफ दुकानाचे मॅनेजर स्वप्नील नंदकिशोर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.