Maharashtra News : लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहिलेला नाही. इव्हीएम वापराविरोधात लोक रस्त्यावर उतरले. मतदान एका पक्षाला करूनही ते दुसरीकडेच नोंदवले जाते, असा आक्षेप आहे.
पब्लिक क्राय लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घ्यायला हवे होते. यावर वेळीच आदेश द्यायला हवा होता; मात्र आता उशीर झाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने ‘इव्हीएम’ विरोधातील सर्व याचिका शुक्रवारी फेटाळाल्या. त्यावर शिर्डी येथील विमानतळावर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप करण्याचा गंभीर आरोप होता. त्यांच्यासह प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांच्यावरील गुन्ह्यांची चौकशी थांबविण्यात आली.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच अटक करणार होते. त्यामुळे शिंदे हे शिवसेना सोडून पळाले. विरोधकांचे फोन टॅप करण्याचा गुन्हा जागतिक स्तरावर गांभीर्याने घेतला गेला असता. कोणत्याही देशात या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकली असती;
मात्र फडणवीसांवरील या आरोपांची चौकशी थांबविण्यात आली. प्रविण दरेकर हे मुंबई बँकेतील घोटाळ्याचे आरोपी होते. गिरीश महाजनांवरही गंभीर आरोप होते; मात्र या सर्वांची चौकशी आता थांबविण्यात आली आहे. सरकारने किमान गुन्ह्यांचा तपास पूर्ण करायला हवा होता. सत्य समोर आले असते.
मुख्यमंत्री शुक्रवारी शिर्डी दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वीच राऊत व देसाई दाखल झाले. मुख्यमंत्री हे आमच्या मागे मागे येतात. आम्ही काय करतो हे पाहण्यासाठीच ते येथे येत असावेत, असा टोला राऊत यांनी लगावला.