अहमदनगर ब्रेकींग: 30 हजाराची लाच घेताना पकडलेल्या लेखापरीक्षकास न्यायालयाने ठोठवला चार वर्षे तुरूंगवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :-  तीन लाख रूपये लाच मागणी करून त्यातील 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला लेखापरीक्षकास न्यायालयाने दोषीधरून चार वर्षे सक्षम कारावास व एक लाख रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

आनंत सुरेश तरवडे असे शिक्षा ठोठावलेल्या लेखापरीक्षकाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल विष्णुदास के. भोर्डे यांनी काम पाहिले. वसंत दादा सहकारी पतसंस्था टाकळी ढोकेश्‍वर (ता. पारनेर) ही संस्था तत्कालीन चेअरमन राजेंद्र रघुनाथ गागरे (रा. टाकळी ढोकेश्‍वर) यांनी वर्धमान सहकारी पतसंस्था, गणेशनगर (ता. राहाता) या पतसंस्थेमध्ये विलगीकरण केली होती.

वर्धमान पतसंस्थेचे लोकसेवक लहानु वामन थोरात यांनी लेखा परिक्षकाच्या माध्यमातून लेखापरिक्षण करून तत्कालिन चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर पतसंस्थेमध्ये अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता. त्या संबंधी सहकार खात्याकडे तक्रार दाखल केली होती.

सदरची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी तरवडे यांच्याकडे सोपविली होती. पतसंस्थेमधील आर्थिक गैरव्यवहार सुनावणीच्या दरम्यान, पतसंस्थेचे चेअरमन गागरे यांच्या मागणीप्रमाणे अहवाल तयार करून देण्यासाठी लेखापरीक्षक तरवडे यांनी तीन लाख लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांच्याकडे 20 ऑक्टोबर 2016 रोजी आरोपीविरूध्द तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा तत्कालिन पोलीस उपअधीक्षक इरफान शेख यांनी केली. त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने सापळा लावण्यात आला.

25 ऑक्टोबर 2016 रोजी लाचेच्या रक्कमेपैकी 30 हजार रूपये पंचासमक्ष स्वीकारताना लेखा परिक्षक तरवडे याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्याविरूध्द लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक शेख यांनी केला.

आरोपी लोकसेवक असल्यामुळे आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तपासी अधिकारी उपअधीक्षक शेख यांनी सहकार खात्याची मान्यता घेतली. त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात साक्षीदारांचा साक्षीपुरवा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आला होता.

त्यांची बदली झाल्यानंतर सदरचा खटला चौकशी व युक्तीवादकामी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्या न्यायालयात वर्ग झाला. न्यायालयामध्ये साक्षीदारांनी दिलेला तोंडी साक्षीपुरावा व सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्यधरून आरोपी तरवडे याला न्यायालयाने दोषी धरून

लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम सात अन्वये चार वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रूपये दंड तसेच कलम 13 (1), (ड) अन्वये चार वर्षे सश्रम कारावास व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यामध्ये महिला पोलीस अंमलदार संध्या म्हस्के व पैरवी अधिकारी सहायक फौजदार डी. डी. ठुबे यांनी सहाय केले.