अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- घराचा दरवाजा तोडून श्रीरामपूर, शिर्डी परिसरात दरोडा घालणारे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

यासीनखाँ उर्फ अनिल शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता.नेवासा), सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (रा.गोंडेगाव, ता.नेवासा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री अशिष अनिल गोंदकर ( वय २३, रा. शिर्डी) आई व आजीसह घरामध्ये झोपलेले असताना अनोळखी ७ ते ८ इसमांनी बंगल्याचे मेनगेट व दरवाजा कटावनीचे सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश करुन आई व आजी

यांना कटावनी व चाकूचा धाक दाखवून हातपाय बांधून घरातील सोने चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण १२ लाख २० हजारांचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. पोनि कटके यांनी गुन्हा घडल्याच्या ठिकाणी भेट देवून माहिती घेतली. अशा प्रकारचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगारांचे फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविण्यात आले.

त्यावरुन फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा तपास चालू असताना पोनि कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की हा गुन्हा अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले व त्याच्या टोळीतील साथीदारांनी मिळून केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी वारंवार आपले वास्तव्याचे ठिकाणे बदलून रहात होते. परंतु पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचे मागावर होते.

त्या दरम्यान आरोपी अनिल भोसले व त्याचा भाऊ गुलब्या भोसले हे दोघे त्यांच्या घरी आले असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ गोंडेगाव येथे जावून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.