काय ती पब्लिक, काय ते ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’ ! पण, चर्चा मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्या चौकशीची, प्रकरण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nilesh Lanke News : भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आणि राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी केली जात आहे. राजकीय पक्ष सध्या उमेदवारांच्या नावांवर मंथन करत आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे.

यामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. तथापि, भाजपाने अजून महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. अशातच मात्र नगर जिल्ह्यात एक मोठी घडामोड घडत आहे. या घडामोडीमुळे सध्या नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य 

खरे तर, सध्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. पण, स्वराज्याचे धाकले छत्रपती संभाजी महाराजांच्या या महानाट्यावरून सध्या नगरमध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित शिवपुत्र संभाजी महानाट्याला नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे.

आयोजकांनी रविवारी या महानाट्याला लाखो लोकांनी हजेरी लावली असा दावा केला आहे. यानिमित्ताने आमदार निलेश लंके यांनी जोरदार माहोल बनवला असल्याच्या चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेल हे महानाट्य निलेश लंके यांच्यासाठी लोकसभेच कवाड खोलणार अशा चर्चा रंगल्या आहेत.

महानाट्याचा प्रयोगाची प्रेरणा सुजय विखे यांच्या कॉन्सर्टवरून 

दरम्यान या महानाट्याचा काल तिसरा दिवस होता. काल रविवार असल्याने या महानाट्याला अनेकांनी हजेरी लावली. गर्दी एवढी तुफान होती की अनेकांना माघारी परतावे लागले. नगर-पुणे रस्त्यालगत तीन किलोमीटरची वाहनाची लांब राग लागलेली होती. या महानाट्याचा आज शेवटचा प्रयोग होणार आहे. या प्रयोगाला देखील मोठी गर्दी राहणार अशी आशा आहे. दरम्यान या महानाट्याच्या माध्यमातून निलेश लंके हे महायुती मधून उमेदवारीसाठी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर दबाव बनवायला यशस्वी झाले आहेत, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 2019 मध्ये नगर दक्षिणचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी अजय-अतुल यांचे कॉन्सर्ट आयोजित केले होते.

याच धर्तीवर आता निलेश लंके यांनी हे महानाट्य आयोजित केले आहे. यामुळे या महानाट्याच्या माध्यमातून लंके यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचे विशेष बारीक लक्ष राहणार आहे. या महानाट्याची विशेषता अशी की महायुती मधल्या एका नेत्यांनी आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमाला महायुतीसह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली आहे. भाजपकडून आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे हे देखील हजर राहिले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि कधीकाळी अहमदनगर काँग्रेसचे ताकतवर नेते, सध्या दिल्ली दरबारी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वात ज्यांचा बोलबाला आहे असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर सडकून टीका केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय म्हटले ?

विखे पाटील यांनी महानाट्य हे जास्तीत जास्त दोन किंवा तीन अंकी असते, यामुळे लवकरच यावर पडदा पडेल असे म्हटले आहे. त्यांनी महानाट्य फार काळ चालणार नाही. लोकसभेला कोण कोठे जाते, याची मला चिंता नाही. महायुतीला राज्यात यश मिळणारच आहे. त्यामुळे कोण कोणाच्या मानेवर जाऊन बसतो, याला फार मी महत्त्व देत नाही, असा खोचक टोला यावेळी लगावला आहे.

भाजप आमदार राम शिंदे यांनी काय म्हटले ?

दुसरीकडे भाजप आमदार राम शिंदे यांनी या कार्यक्रमात निमित्ताने आमदार निलेश लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. एवढेच नाही तर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानची यामुळे चौकशी होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त केली आहे. तसेच यावेळी बोलताना आमदार राम शिंदे यांनी, टी-ट्वेन्टीमध्ये कमी चेंडूंत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूचा जसा रनरेट असतो तसा आमदार नीलेश लंके यांचा रनरेट सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.

ते सर्वाधिक लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आमदार असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी यावेळी केले आहे. त्यामुळे त्यांना भविष्याची कसलीही काळजी करण्याचे कारण नाही. छत्रपती संभाजी महारांजाचा इतिहास इतक्या वर्षांनंतरही दैदिप्यमान आहे. लोकांना जे हवे आहे ते देण्याचे काम आमदार लंके यांनी केले आहे, अशा शब्दात आमदार राम शिंदे यांनी अजितदादा यांच्या गटातील आमदार निलेश लंके यांचे कौतुक यावेळी केले आहे. यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात लंके आणि शिंदे यांच्या या जुगलबंदीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

लंके यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानची चौकशी होतेय ?

आमदार निलेश लंके यांनी हे महानाट्य आयोजित झाले असल्याने निलेश लंके प्रतिष्ठानची चौकशी होत असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी अनेकांनी निलेश लंके प्रतिष्ठानची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले. काही जणांनी जाणीवपूर्वक तक्रारी केल्यात. मात्र हा संपूर्ण कारभार ट्रान्सपरंट असल्याने ते यात यशस्वी झाले नाहीत असे लंके यांनी सांगितले आहे. एकंदरीत निलेश लंके यांनी लंके प्रतिष्ठानची काही लोकांनी जाणीवपूर्वक चौकशी लावण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे.

सोबतच हे महानाट्य राजकीय हेतुने नव्हे तर सामाजिक हेतूने आयोजित झाले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले आहे. एकंदरीत स्वराज्याच्या धाकल्या छत्रपतींच्या या महानाट्यावरून सध्या अहमदनगरमध्ये राजकीय नाट्य देखील पाहायला मिळत आहे. तथापि हे महानाट्य आता निलेश लंके यांना आगामी निवडणुकीत फायद्याचे ठरणार का ? यामुळे डॉक्टर सुजय विखे यांच्या उमेदवारीला धक्का बसणार का ? या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या राहणार आहेत.