अहमदनगर ब्रेकिंग : हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून विषबाधा झालेल्या महिलेचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : अकोले तालुक्यातील मवेशी शिवारातील करवंददरा येथे मंगळवारी २७ फेब्रुवारीस हळदीच्या कार्यक्रमात विषबाधा झालेल्या रुग्णापैकी वेणूबाई रामचंद्र भांगरे (वय ६०, रा. करवंददरा) यांचा उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर शुक्रवारी (१ मार्च) मृत्यू झाला.

मवेशी गावात २८ फेब्रुवारीला करवंददरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी (ता. अकोले) येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी करण्यात आला. यानिमित्त २७ फेब्रुवारीला नवरदेवाच्या घरी करवंददरा येथे रात्री हळदीचा कार्यक्रम झाला.

हळदीच्या कार्यक्रमात सर्वांनी जेवण घेतले. या लोकांपैकी २०० व्यक्तींना जेवणातून विषबाधा झाली. विषबाधा झाल्यापैकी अतिगंभीर ७ बालकांचा ५९ रुग्णांना राजूर, कोहणे, समशेरपूर, खिरविरे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार पत्नी पुष्पा लहामटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, मधुकर तळपाडे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचारार्थीना भेटून तब्येतीची विचारपूस केली.

अतिगंभीर रुग्ण वगळता इतर सर्व रुग्ण औषधोपचार घेतल्यानंतर घरी गेले. मात्र यातील ९ रुग्णांवर अद्याप राजूर व नाशिक येथे उपचार सुरूच आहेत.

उपचारानंतर वेणूबाई रामचंद्र भांगरे यांची घरी गेल्यावर प्रकृती पुन्हा बिघडली व त्यातच शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

या महिलेच्या मुलांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून आईच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणीची मागणी केली. राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी केली.