वो साल दूसरा था, ये साल दूसरा है !! गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात, पण यंदाच्या निवडणुकीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांचा एकत्रित प्रचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अखेरकार ज्या लोकसभा निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. पाच वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल पासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार आहे.

संपूर्ण देशभरात सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असून चार जून 2024 ला यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे ते नेते आता प्रचारासाठी जनसामान्यांमध्ये जात आहेत.

सुजय विखे यांनी देखील पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर जोमात प्रचाराची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे यावेळी सुजय विखे हे गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात असलेल्या संग्राम जगताप यांच्या समवेत एकत्रित प्रचार करत आहेत.

गेल्या वेळी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपा कडून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळालेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली गेली होती.

त्यावेळी झालेली या दोन्ही युवा नेत्यांची लढत विशेष लक्षवेधी ठरली होती. गेल्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र निवडणूक झाल्यानंतर सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी अनेक कार्यक्रमांना एकत्रित हजेरी लावली.

या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीनंतर शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केले. विशेष म्हणजे त्यावेळी संग्राम जगताप महाविकास आघाडी मध्ये होते. परिणामी त्यांच्यावर अनेकांनी टिका केली. पण, महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये विविध राजकीय घडामोडी घडल्यात.

राज्यातील दोन मोठे पक्ष फुटलेत. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात देखील उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजितदादा पवार बाहेर पडलेत आणि त्यांनी सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

आमदार संग्राम जगताप हे देखील अजित दादा यांच्या समवेत महायुतीत आलेत. यामुळे आमदार संग्राम जगताप आमचे नेते अजित दादा पवार जे आदेश देतील कशा पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ आणि सुजय विखे यांच्यासाठी काम करू असं सांगत आहेत.

महाविकास आघाडीमध्ये असतानाच जगताप यांनी सुजय विखे यांच्याशी जुळवून घेतलं अन त्याचा आता कुठेतरी त्यांना फायदाही होत आहे. या दोघा युवा नेत्याची बॉण्डिंग यामुळे घट्ट झाली आहे. गेल्या वेळी ज्या दोन युवा नेत्यांमध्ये लोकसभेसाठी लढत झाली होती तेच युवा नेते आता एकमेकांसोबत आहेत.

सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप हे आता एकत्रित प्रचार करत आहेत. यामुळे वो साल दूसरा था, ये साल दूसरा है !! या गाण्याप्रमाणेच नगर दक्षिणचे राजकारण पाहायला मिळतं आहे. एकमेकांचे धूरविरोधी आता एकच व्यासपीठावर हजेरी लावत आहेत आणि एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत आहेत.