डॉ सुजय विखे विरुद्ध आमदार लंके ; कोण आहे विजयाचे दावेदार, काय आहे मतदारसंघात परिस्थिती ? वाचा सविस्तर 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अजित दादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या मागावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जातील अशा चर्चा आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मात्र या चर्चांना अधिक ऊत आले आहे. कालच्या घटनेवरून तर निलेश लंके हे शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचे स्पष्ट होत आहे.

यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून डॉक्टर सुजय विखे यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके यांची लढत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या लढतीचे गणितही आता मांडली जाऊ लागली आहेत. या लढतीत कोणाची सरशी होणार, कोणाचे पारडे जड भरणार ? या संदर्भात राजकारणातील जाणकार लोक अंदाज बांधत आहेत.

लंके यांची दोन वर्षांपासून तयारी

खरेतर, भारतीय जनता पक्षाने नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे निलेश लंके यांना शरद पवार यांच्या गटाकडून तिकीट मिळेल असे चित्र आहे. यामुळे महायुतीमधून विखे आणि महाविकास आघाडी कडून लंके यांची काटेदार लढाई होणार असल्याचे बोलले जात आहे. लंके यांनी दोन वर्षांपासून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. जाणकार लोक जर महाविकास आघाडी कडून लंके यांना तिकीट मिळाले तर सुजय विखे यांना कडाक्याचे आव्हान मिळू शकते असे म्हणत आहेत.

अहमदनगर दक्षिणच राजकीय गणित काय सांगत ?

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. 2019 पूर्वी या जागेवरून भाजपाचे दिलीप गांधी यांनी तीन वेळा खासदारकी भूषवली आहे. पण, 2019 मध्ये गांधी यांचे तिकीट कापले गेले आणि या जागेवर काँग्रेस मधून आलेल्या डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली. विखे यांनी या जागेवरून विजय मिळवत आता पुन्हा एकदा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून तिकीट खेचून आणले आहे.

मात्र येत्या लोकसभा निवडणुकीत विखे यांना विजय मिळवणे दिसते तेवढे सोपे राहणार नाही. कारण की विखे यांचा स्व-पक्षातूनच मोठा विरोध होत आहे. भाजपामधील विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती. मात्र पक्षाने विद्यमान खासदार यांच्यावर अधिक विश्वास दाखवला आहे.

परंतु असे असले तरी रामभाऊ उघडपणे विखे यांचा विरोध करत आहेत. जिथे विखे विरोधी व्यासपीठ असते तिथे रामभाऊंची हजेरी पाहायला मिळते. दुसरीकडे जिल्ह्यातील भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांचे देखील विखे यांच्यासोबत राजकीय वैर असल्याचे पाहायला मिळते. यामुळे रामाभाऊंच्या जोडीला विवेक दादा सुद्धा नेहमीच विखे विरोधी व्यासपीठावर हजेरी लावतात.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी लंके प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या कार्यक्रमाला नगर शहरात या दोन्ही भाजपाच्या नेत्यांनी हजेरी लावलेली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांनी लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत तर दुसरीकडे विखे यांचा खरपूस समाचार घेतला.

याशिवाय भाजपाचे इतर अनेक निष्ठावंत कार्यकर्ते देखील विखे यांना विरोध करत आहेत. पक्षांतर्गत विरोध तर वाढतच आहे शिवाय विरोधकांनी देखील विद्यमान खासदारांना तगड आव्हान देण्यास सुरवात केली आहे. यामुळे जर निलेश लंके यांना महाविकास आघाडी कडून तिकीट मिळाले तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एक टफ फाईट लढाई पाहायला मिळू शकते.

कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे लंके यांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. भाजपाकडे  श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे आहेत, पण राष्ट्रवादीचा विरोधी गट येथे कमालीचा सक्रीय आहे. भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे.

यामुळे जर लंके विरुद्ध विखे लढत झाली तर लंके विखेंना तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. याशिवाय, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे देखील लंके यांना मदत करतील. यामुळे आगामी निवडणुकीत जर महाविकास आघाडीकडून लंके यांना तिकीट मिळाले तर विखे विरुद्ध लंके ही लढाई चुरशीची होणार यात शंकाच नाही.