‘निलेश लंके अहमदनगरमधील लोकप्रिय नेते, ते 100% निवडून येतील, पण…..’ शरद पवार गटातील जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jayant Patil On Nilesh Lanke : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून ढवळून निघाले आहे. विशेषतः नगर दक्षिण मधील राजकीय वातावरण पूर्णपणे संभ्रमाचे पाहायला मिळत आहे. खरेतर महायुतीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे आणि या यादीत सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून या जागेवर कोण उमेदवार राहणार हे अजून ठरू शकलेले नाही.

परंतु महाविकास आघाडी कडून निलेश लंके हे उमेदवारी करू शकतात अशा चर्चा आहेत. निलेश लंके हे सध्या अजितदादा यांच्या गटात आहेत मात्र लवकरच ते हाती तुतारी घेतील, शरद पवार गटात प्रवेश करतील आणि या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत.

परंतु त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अजूनही अधिकृतपणे शरद पवार किंवा निलेश लंके यांनी पत्ते मोकळे केलेले नाहीत. याचे कारण म्हणजे जर लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याबाबत किंवा अजितदादा यांच्या गटाबाबत कोणत्याही विधान केले तर त्यांच्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होऊ शकते.

यामुळे सध्या स्थितीला लंके हे मौन बाळगून आहेत. यामुळे निलेश लंके यांच्या घरवापसीसंदर्भात सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्याबाबत एक सूचक वक्तव्य केले आहे.

जयंत पाटील यांनी नूकतीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लंके यांच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य केले असून सध्या या वक्तव्याची नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

काय म्हटलेत जयंत पाटील 

जयंत पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना असे म्हटले आहे की, ‘निलेश लंके हे एक लोकप्रिय नेते आहेत. ते नगर दक्षिण मधून जर लोकसभेसाठी उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील.’ तसेच त्यांनी ‘लंके हे आमचे उमेदवार व्हावेत. त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू,’ असे सुद्धा म्हटले आहे.

अहमदनगरमध्ये तुतारी वाजणारच 

जयंत पाटील यांनी यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हटलेत की, ‘मी निलेश लंके यांना तुतारी भेट दिली होती. ती तुतारी त्यांनी घेतली. परंतु, मी असं कोणतंही वक्तव्य करणार नाही, ज्यामुळे निलेश लंके अडचणीत येतील.

लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही याबाबत मी सध्या भाष्य करणार नाही. कारण असं केल्याने ते अडचणीत येऊ शकतात आणि मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. मात्र मी एक गोष्ट ठामपणे सांगेन की, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. आम्ही येथून जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’

एकंदरीत जयंत पाटील यांनी निलेश लंके यांना योग्य वेळ आल्यानंतर या जागेवरून उमेदवारी दिली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत. मात्र अजूनही याबाबतचा अधिकृत निर्णय झालेला नाही. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे या जागेवरून निलेश लंके यांनाच उमेदवारी मिळू शकते असा कयास बांधला जात आहे.