आ.निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा, विधानसभा अध्यक्षांना पाठवला राजीनामा.. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा लढवणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nilesh Lanke News : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. निलेश लंके यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरु होत्या त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आहेत. निलेश लंके यांनी अजितदादा यांना सोडचिठ्ठी देत आज अधिकृतरित्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हाती तुतारी घेतली आहे.

खरेतर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या चर्चा सुरू होत्या. स्वतः निलेश लंके यांनी देखील मध्यंतरी ते शरद पवार यांच्या गटात सामील होतील असे संकेत दिले होते. मोठ्या साहेबांनी अर्थात शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे पुण्यात आपल्या पक्ष कार्यालयात स्वागत केले होते.

त्यावेळी निलेश लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले होते. यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके हे अहमदनगर मधील लोकप्रिय नेते आहेत. ते आमचे उमेदवार व्हावेत, त्यांनी अहमदनगर मधून लोकसभा निवडणूक लढवावी असे म्हटले होते.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील निलेश लंके यांची अहमदनगर दक्षिण मधून जोरदार एन्ट्री होईल आणि यंदाची निवडणूक देखणी होईल असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानामुळे निलेश लंके हे महाविकास आघाडीचे 2024 लोकसभा निवडणुकीचे नगर दक्षिण मधील उमेदवार राहतील हे जवळपास स्पष्ट झाले होते.

दरम्यान आज यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज औपचारिक रित्या निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. यावेळी निलेश लंके यांनी मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार साहेब, साहेबांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे, असे म्हटले आहे.

अर्थातच भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार तथा यंदाच्या निवडणुकीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात लोकसभेची लढत होणार आहे. निवडणूक ही सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी असली तरी देखील प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध विखे अशी ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

लंके यांनी त्यांच्या मतदारसंघातील सुपा येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्यातच त्यांनी तुतारी या चिन्हावर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची मोठी घोषणा केली आहे. निलेश लंके यांनी अजितदादा यांच्या गटाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची मोठी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला असल्याची बातमी देखील समोर आली आहे.

यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच निलेश लंके यांनी घेतलेला हा निर्णय अजितदादा यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान लंके आता शरद पवार गटाचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. यामुळे यंदाची निवडणूक खऱ्या अर्थाने देखणी होणार आहे. 2019 मध्ये विक्रमी मताधिक्याने विजयी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आता निलेश लंके हे निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत.