निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का ! शिर्डीतला ‘हा’ बडा नेता शिंदे यांच्या गटात, आता कसं राहणार शिर्डी लोकसभेच समीकरण ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येत आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना पक्षातील शिर्डीमधील एक बडा नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे यांच्या गटाला जय महाराष्ट्र म्हणतं एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल अर्थातच 21 मार्च रोजी कांबळे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघात घडलेली ही घडामोड उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी धक्कादायक मानली जात आहे. यामुळे ठाकरे गटाला आगामी लोकसभेत मोठा फटका बसू शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

खरेतर कांबळे हे श्रीरामपूर मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयश्री मिळवता आला नाही. तथापि ते दोनदा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.

ते आधी काँग्रेसमध्ये होते. मात्र काँग्रेसमध्ये झालेल्या मतभेदानंतर त्यांनी शिवबंधन बांधले. तसेच, जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला. पण, आता त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.

खरंतर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून तथा महा विकास आघाडीकडून अजूनही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीकडून उबाठा शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार असे म्हटले जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी देऊ शकतो अशा चर्चा आहेत.

दुसरीकडे महायुतीकडून ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तथापि या जागेवर अजूनही महायुतीकडून उमेदवार निश्चित नाहीये.सध्या या मतदारसंघातून सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. सदाशिव लोखंडे हे सध्या शिंदे यांच्या गटात असून त्यांनी दोनदा खासदारकी भूषवली आहे.

विशेष म्हणजे यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात जनमाणसांमध्ये मोठी नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. हेच कारण आहे की शिर्डीची जागा भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये येऊ पाहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ शकते अशा चर्चा आहेत.

जर मनसे महायुतीत आले तर शिर्डीची जागा त्यांना मिळेल आणि त्या जागेवरून मनसे बाळा नांदगावकर यांना तिकीट देईल अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील या जागेवर दावा ठोकला आहे. अशातच आता शिंदे यांच्या गटात माजी आमदार कांबळे यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणूक आधी लढवली सुद्धा आहे. यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गट कांबळे यांना उमेदवारी देऊन ही जागा त्यांच्याकडेच ठेवू शकते अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. एकंदरीत कांबळे यांच्या शिंदे गटात जाण्याने आता या जागेवर कोण उभे राहणार ? याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.