नगर जिल्ह्यातील दाढ खुर्द गावची कन्या आणि जावई यांची एकाच वेळेस अधिकारी पदाला गवसणी! वाचा यशाची कहाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असून या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी कठीण परिश्रम तसेच नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रत्येक पायरीनुसार परीक्षेची तयारी करणे खूप गरजेचे असते. यामध्ये कष्ट आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असून तरच यश मिळणे शक्य असते.

जर आपण गेल्या काही वर्षांचा या परीक्षेचा निकालांचा मागोवा घेतला तर आपल्याला दिसून येते की ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळवले असून अगदी शेतकरी कुटुंबातील तरुण-तरुणींनी देखील अधिकारी पदाला गवसणी घातलेली आहे.

साहजिकच या यशामागे त्यांचे कष्ट आणि अभ्यास या बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या दाढ खुर्द या गावचे लेक आणि जावई यांनी देखील मोठ्या कष्टाने या स्पर्धा परीक्षेमध्ये एकत्रित यश संपादित केले असून त्यांची नियुक्ती आता पशुधन विकास अधिकारी म्हणून होणार आहे. त्यांच्याच यशाबद्दलची कहाणी आपण या लेखात बघणार आहोत.

 दाढ खुर्द येथील लेक आणि जावई यांनी एकत्रित घातली अधिकारी पदाला गवसणी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या दाढ खुर्द या गावचे प्रगतिशील शेतकरी साहेबराव भांड यांची कन्या आणि जावई यांनी अलीकडे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून त्यांची आता अधिकारी पदावर नियुक्ती होणार आहे.

त्यामुळे या दोघेही पती-पत्नीचे परिसरातून कौतुक केले जात आहे. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली व यामध्ये डॉ.अमोल देविदास आडभाई आणि डॉ. ज्ञानेश्वरी आडभाई या उत्तीर्ण झालेल्या अधिकारी पती-पत्नीची नावे आहेत. या दाम्पत्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग सेवा परीक्षेमध्ये वर्ग एक पदी निवड झाली असून ज्ञानेश्वरी या परीक्षेत महिलांमध्ये राज्यात दहाव्या तर नगर जिल्ह्यामधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये डॉ.अमोल आणि ज्ञानेश्वरी हे विवाह बंधनामध्ये अडकले व डॉ.ज्ञानेश्वरी यांचे माहेर हे संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द या गावचे आहे व सासर हे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील आहे. या दोघं पती-पत्नींनी सगळी जबाबदारी सांभाळून परीक्षेची तयारी सुरू ठेवली व यामध्ये त्यांना कुटुंबाची खूप मोठी साथ मिळाली.

 डॉ.अमोल आणि ज्ञानेश्वरी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी

डॉ.अमोल आडभाई यांनी जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सायखेडा तालुका निफाड या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे व शिरवळ जिल्हा सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे व त्यासोबतच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल,

हरियाणा राज्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यासोबतच डॉ.ज्ञानेश्वरी यांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळी,ता.संगमनेर या ठिकाणी प्राथमिक तर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालयातून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन आश्वी खुर्द येथून उच्च माध्यमिक शिक्षण घेतले

व सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पशुवैद्यकीय शिक्षण पदवी देखील प्राप्त केली. जर दोघांचा विचार केला तर डॉ.ज्ञानेश्वरी यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये  तर डॉ.अमोल यांनी दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले. या दोघेही जणांची लवकर आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागांमध्ये पशुधन विकास अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.

अशा पद्धतीने अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या बळावर तसेच अभ्यासाचे नियोजन तंतोतंत ठेवून त्यांनी हे यश मिळवले आहे.