अण्णा हजारे यांच्या ‘त्या’ पत्राने पारनेर तालुक्यातील ‘ती’ बँक चौकशीच्या फेऱ्यात!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सहकार आयुक्तांकडे केली होती.

त्यानुसार सैनिक बँकेच्या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी पूर्ण होत आली आहे. यासाठी सहकार विभागाचे पथक बँकेत सुमारे २५ दिवसांपासून तळ ठोकून होते. आता चौकशीत काय निष्पन्न होते? याची उत्सुकता सभासदांना लागली आहे.

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे सहकार विभागाकडे दिले होते व तपासणी व्हावी अशी मागणीही केली होती. मात्र सहकार विभाग ठोस निर्णय घेत नव्हते.

शेवटी तक्रारदारानी सदर फाईल या बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे दिली. हजारे यांनी अभ्यास करून खात्री झाल्यावर सहकार आयुक्तांना लेखी पत्र पाठवून सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली.

सहकार आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणतात की, आपणही निवृत्त सैनिक आहे. तालुक्यातील इतर सैनिकांनी आग्रह केल्यानंतर सातारा जिल्हयातील सैनिक बँकेप्रमाणेच पारनेर तालुक्यातही सैनिक बँकेची स्थापना करावी, असा आग्रह आपणाकडे धरला.

ही संकल्पना आपल्याला आवडल्यानंतर आपण भारतीय रिझर्व बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर सन १९९६ साली या सैनिक बँकेला परवाना मिळाला. या बँकेचे संस्थापक अध्यक्ष आपण असल्यामुळे बँकेला ठेवी जमा झाल्या.

परंतु आपणास कोणतीही निवडणूक लढवायची नसल्याने पाच वर्षांनंतर अध्यक्षपदावरून दूर झालो व बँकेच्या अध्यक्ष, संचालकपदाची धुरा इतर माजी सैनिकांकडे सोपवली.

या बँकेला उज्वल भविष्य लाभावे ही आपली संकल्पना होती मात्र, अलीकडच्या काळात या बँकेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झाल्याचे पुरावे आपणाकडे आल्याने दुःख झाले आहे.