काँग्रेसलाही भगवानगडाची भुरळ, प्रदेशाध्यक्ष पटोले पोहचले गडावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काँग्रेसलाही भगवानगडची भुरळ पडली आहे. भाजपकडून प्रचाराची सुरवात येथून केली जाते, तर राष्ट्रवादीकडूनही ओबीसींच्या तुष्टीकरणासाठी गडाचाच आधार घेतला जातो.

या काँग्रेसचीही त्यात भर पडणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडावर येऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात आणि देशात ओबीसी चळवळ उभी करण्यासाठी भगवानगडापासून सुरुवात करावी लागणार आहे.

एवढेच नाही तर महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रथम भगवानगडावर येऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह भगवानगडावर येऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

ते म्हणाले, लोकशाहीच्या मार्गाने मला मुख्यमंत्रीपद मिळाले तर संत भगवान बाबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचे काम करायचे असून लोकशाहीतील सर्वात मोठी असलेली त्या खुर्चीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा हीच संत भगवानबाबांची विचारसरणी होती.

बहुजनांच्या उत्थानाची प्रेरणा घेण्यासाठी मी भगवानगडावर भगवान बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे झालेला दसरा मेळावा आणि मी भगवानगडावर येणे हा फक्त योगायोग आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.