विजेअभावी शेतकऱ्यांसह नागरिक सापडले अंधारात; कोल्हेंनी धाडले ऊर्जामंत्र्यांना पत्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यात एकीकडे पावसाने ओढ दिली तर दुसरीकडे ज्या शेतकर्‍यांच्या विहिरींना पाणी आहे पण वीज नसल्यामुळे सोयाबीन, मका, बाजरी आदी खरीप पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत.

शेतकर्‍यांवर दुहेरी संकट कोसळत असताना महावितरणला अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखविण्याचे काम सर्रासपणे केले जाते. वीज समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे अन्यथा याविरूध्द रस्त्यावरून उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे.

कोल्हे यांनी कोपरगाव शहर व मतदार संघातील विजेच्या समस्यांसंदर्भात उर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य कार्यकारी अभियंता नाशिक व कार्यकारी अभियंता संगमनेर यांना पत्र लिहिले आहे. कोपरगावची अवस्था अंधेर नगरी चौपट राजा अशीच झाली आहे.

ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे ते याबद्दल बोलायलाही तयार नाहीत. कोपरगाव विधानसभा मतदार संघात विजेचा खेळखंडोबा झाला असून किरकोळ समस्यांनाही कुणी वाली नाही. त्यामुळे विहिरींना पाणी असूनही ते पिकांना देता येत नाही अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली असून नादुरूस्त वीज रोहित्रे मिन्नतवारी करूनही दुरूस्त करून मिळत नाही.

छोट्या-छोट्या कामांसाठीही चकरा मारून वीजग्राहक, शेतकरी वैतागला आहे. कुठे फ्युज नाही, असंख्य रोहित्र उघड्यावर धोकेदायक स्थितीत असून त्यातील इंधन चोरीला जात आहे. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षमतेपेक्षा जादा लोड वाढल्याने वीज खंडीत होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

नवीन वीज कनेक्शन मिळण्याबरोबरच जुन्या वीज समस्यांचा डोंगर वाढला आहे. अशा एक ना अनेक समस्या वाढूनही त्याकडे कोपरगाव शहर व ग्रामिण उपअभियंते व त्यांचे जबाबदार अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत.

संपूर्ण मतदार संघात विजेची दुरवस्था झाली आहे. तेव्हा उर्जामंत्री यांनी लक्ष घालून कोपरगावच्या वीज समस्या तात्काळ सोडवाव्यात, असे सौ. कोल्हे म्हणाल्या.