आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ?, काँग्रेसची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये छोटे-मोठे मिळून सुमारे शंभर रस्त्यांची कामे पूर्ण केल्या बाबतची माहिती पालकमंत्रांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदे आयुक्तांनी जाहीर केली.

काँग्रेसने यावर सवाल उपस्थित करत “आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ? असे म्हणत थेट आयुक्तांनाच पत्र धाडले आहे.

“त्या” रस्त्यांची यादी नगरकरांना उपलब्ध करून देण्याच्या मागणी बरोबरच आधी चितळे रोड, दालमंडईसह संपुर्ण बाजारपेठ तातडीने “धुळमुक्त” करण्याची मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

आयुक्तांना धाडलेल्या पत्राची प्रत काँग्रेसने ई-मेलद्वारे शहराच्या आमदारांना देखील धाडली आहे. शंभर रस्त्यांची कामे पूर्ण केल्याच्या आयुक्तांच्या दाव्यावर उपहासात्मकरित्या काँग्रेस पक्षाने आयुक्तांचे आणि महानगरपालिकेचे आभार मानून अभिनंदन केले आहे.

आयुक्तांनी दावा केल्याप्रमाणे जर “ते” १०० रस्ते नगर शहरामध्ये झाले असतील तर मात्र नगर शहरातील नागरिक रोज “ज्या” रस्त्यांवरून दळणवळणासाठी ये-जा करतात की ज्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो,

धुळीतून जावे लागते, त्यांना अनेक पाठीचे – मणक्याचे आजार यामुळे उद्भवले आहेत, अनेक अपघात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होत आहेत, “हे” रस्ते नक्की कोणते आहेत ? ते नगरकरांना आपण केलेल्या घोषणेमुळे समजेनासे झाले आहे.

त्यामुळे दावा केलेले महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून पुर्ण झालेले १०० रस्ते हे नेमके नगर शहरात आहेत ही यूक्रेन, रशिया किंवा अन्य इतर कोणत्या देशात आहेत याची शहानिशा होणे महत्त्वाचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

आपण १०० रस्त्यांची यादी उपलब्ध करून दिली की आम्ही नक्कीच याचा “अभ्यास” करूच असे म्हणत किरण काळे यांनी बाजारपेठेतील रस्त्यांकडे मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

चितळे रोड, दाळमंडईसह सबंध बाजारपेठेमध्ये रस्ता शोधून सुद्धा सापडेनासा झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. व्यापारी बांधवांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या पोटावरती पाय पडला आहे.

त्यांना मोठया आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेत खड्ड्यां बरोबरच धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे ग्राहक असणारे नागरिक बाजारपेठेमध्ये फिरकायला तयार नाहीत.

ग्राहक नागरिकांना देखील यामुळे बाजारात जाता येऊ शकत नसल्यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे व्यापारी व ग्राहक नागरिक हे दोन्ही देखील त्रस्त झाले आहेत.

आपण केलेल्या शंभर रस्त्यांच्या यादीमध्ये बाजारपेठेतील एकही रस्ता कसा नाही हा देखील मोठ्या संशोधनाचा विषय आहे. त्यामूळे चितळे रोड, दालमंडईसह बाजारपेठेतील सर्व रस्ते खड्डे बुजवून तात्काळ धूळमुक्त करण्याची मागणी व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांसाठी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.