पाचपुतेंचे नाव पत्रिकेत खाली टाकाल, तर खपवून घेणार नाही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  माजी मंत्री व राज्यातील ज्येष्ठ आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांचे नाव कोनशिलेवर व कार्यक्रम पत्रिकेत खाली टाकले गेले. यापुढे जर अशी चूक नगरपालिकेने केली, तर ती कदापी खपवून घेतली जाणार नाही, त्यास भाजपचे १२ नगरसेवक चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी पत्रकाद्वारे दिला.

१४ व्या वित्त अयोगातून मंजूर झालेल्या १ कोटी ४४ लाख ६६ हजार रुपयांच्या ड्रेनेजलाईनचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावर बबनराव पाचपुते यांचे नाव प्रमुख नेत्यानंतर उपस्थितांमध्ये टाकण्यात आले.

यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला. लाढाणे म्हणाले, बबनराव पाचपुते यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी नगरपरिषदेस मिळवून दिला.

पाचपुते यांच्यामुळेच गावाचे शहरात रूपांतर झाले. शहराला जोडणारे १७ रस्ते, नळयोजना, बाह्यवळण रस्ता, ड्रेनेज लाईन, अंतर्गत रस्ते, सांस्कृतिक भवन, नाना नाणी पार्कसाठीचा निधी आदी काम कोणामुळे झाले याचे सत्ताधार्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

परंतु पालिकेच्या कामावरून राजकारण सुरू झाले आहे. प्रत्येक नगरपरिषदेने कोविड सेंटर सुरू करावे हा शासनाचा आदेश आहे. हा आदेश आल्यानंतर स्टडी सर्कलची जागा कोविड सेंटरसाठी द्यावी, असा ठराव भाजप नगरसेवकांनी मांडला.

येथे सेंटर सुरू करण्यात येईल. त्यात आमचे नगरसेवक सहकार्यच करतील. मात्र नागरिकांची दिशाभूल करून काही वेगळेच वक्तव्य करून कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे व भाजप नगरसेवकांनी दिला.