Maharashtra School : शिक्षण विभागाचं ठरलं, हा असेल दरवर्षी शाळा सुरू होण्याचा दिवस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 School News :- शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आणि सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू होण्याचा दिवस यावरून दरवर्षीच गोंधळाची स्थिती असते. पूर्वी शाळा सुरू होण्याचा दिवस १५ जून हा ठरविण्यात आला होता.

मात्र, त्यातही विविध अडचणी येत असल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता शिक्षण विभागानं निर्णय घेतला असून यापुढं दरवर्षी राज्यातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सुरू होणार आहेत.

विदर्भात रखडणारा उन्हाळा लक्षात घेऊन चौथ्या सोमवारी शाळा सुरू होतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून हा नवा निर्णय राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू होणार आहे.

दुसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास, त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळा सुरू होतील. शालेय शिक्षण विभागानं हे परिपत्रक जारी केलं आहे. यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा घोळही मिटविण्याचा यामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे.

त्यानुसार २ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी राहणार आहे. जूनचा दुसरा सोमवार म्हणजेच १३ जूना शाळा पुन्हा सुरू होणार आहेत.

शाळांनी घेतलेल्या परीक्षांचा निकाल ३० एप्रिलला जाहीर करायचा आहे. ते शक्य झाले नाही, तर सुट्टीत तो जाहीर करून विद्यार्थी व पालकांपर्यंत शाळांनी तो पोहचवायचा आहे.

उन्हाळी व दिवाळीची सुट्टी कमी करून इतर सणांसाठी सुट्टी घेण्याचा अधिकार संबंधित शाळांना आहे, मात्र त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत ७६ दिवसांपेक्षा जास्त काळ सुट्टी दिली जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.