मोबाइल हॉस्पिटल कोरोना काळात ठरतेय कर्जत जामखेडकरांसाठी वरदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविधप्रकारे अडथळा येतो.

तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत जामखेडमधील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये, याकरिता आमदार रोहित पवार यांंनी ‘मोबाइल हॉस्पिटल’ हा उपक्रम चार महिन्यांपूर्वी सुरु केला.

गेल्या चार महिन्यांत ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांना मोफत घरपोच प्राथमिक उपचार व औषधे देण्यात आली आहेत. या उपक्रमाचे कर्जत व जामखेडमधील वयोवृध्द,

गर्भवती महिला व विकलांग नागरिकांकडून कौतुक होत आहे. रोहित पवार यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम कर्जत व जामखेडकरांसाठी कोरोनाच्या या काळात एक वरदानच ठरत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका खाजगी बँकेच्या सहकार्यातून रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कर्जत-जामखेडवासीयांसाठी उपयुक्त ठरत आहे.

कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन मोबाईल क्लिनीक व्हॅन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करते.

‘मोबाईल क्लिनिक’ व्हॅनसोबत ‘तज्ज्ञ’ डॉक्टरांची टीम तैनात असून नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथिमक उपचार करून त्यांना औषधे देण्यात येतात.

केवळ इतकेच नव्हे तर व्हॅनमध्ये असणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेद्वारे रक्तदाब, मधुमेह तपासणी देखील करण्यात येत आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही.

या जाणिवेतून वयोवृध्द नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून घरपोच मोफत तपासणी होऊन त्यांना औषधोपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम सुरु केलेला आहे.

तसेच बहुतांश नागरिकांमध्ये रक्तदाब, मधुमेहाची समस्या असल्याचे या तपासणी उपक्रमात आढळून आले.आजवर माझ्या ११ हजारहून अधिक कर्जत जामखेडवासीयांना याचा लाभ मिळाला असून फिरता दवाखान्याची ही सुविधा यापुढेही लोकसेवेसाठी गावोगावी अशीच कार्यरत राहणार आहे.

या उपक्रमासाठी परिचारिका व आशाताई यांची मोलाची साथ मिळाली, याबद्दल त्यांचे आभार, असे आमदार राेहित पवार म्हणाले.