संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाचे सुमारे ४५ कोटींहुन अधिकचे नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या साडेतीन महिन्यांपासून संप पुकारला आहे. मात्र संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

एसटी प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर हजर होत नाहीत. त्यामुळे अखेर निलंबनाचे हत्यार उपसण्यात आले. आंदोलनामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आजपर्यंत एक हजार १७१ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. अनेक गावांत एसटी जात नसल्याने जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमाने सुरू आहे. संपामुळे एसटीच्या अहमदनगर विभागाचे सुमारे ४५ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दाद न देणाऱ्यांचे निलंबनही केले जात आहे. आतापर्यंत ३२५ जणांवर बडतर्फीची कारवाई झाली.

३०६ जणांचे निलंबन करण्यात आले. जिल्ह्यात प्रवाशांसाठी सध्या १५७ बसच्या माध्यमातून रोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. त्यातून एसटीला सुमारे २० लाखांचे उत्पन्न मिळते.

जिल्‍ह्यात राज्य परिवहन महामंडळाची एकूण ११ आगारे आहेत. त्यांतील दहा आगारांतून एसटीचे सेवा अडखळत सुरू आहे. मात्र, साडेतीन महिन्यांत पारनेर आगाराची एकही बस धावलेली नाही.

एसटी सेवा विस्कळित असल्याने शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या एसटी फेऱ्या तूर्त बंद असल्याने, विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.