Ajab Gajab News : समुद्रात सापडले चक्क सोन्याचे अंडे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajab Gajab News : सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही म्हण आपण ऐकून आहोत; पण याचा अर्थ असा नव्हे की, खरोखरच कोंबडी सोन्याचे अंडे देते. हे लाक्षणिक अर्थाने घ्यावे लागते. म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपण मालामाल होतो त्याला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असे म्हटले जाते; पण अमेरिकेच्या सागरी वैज्ञानिकांना तर चक्क समुद्राच्या पोटात सोन्याचे अंडे सापडले आहे.

अमेरिकेच्या वैज्ञानिकांना प्रशांत महासागरातील एका शोध मोहिमेदरम्यान हे सोन्याचे अंडे हाती लागले आहे. हे वैज्ञानिक खरे तर समुद्राच्या तळाशी असलेल्या ज्वालामुखीचा अभ्यास करत होते. अनायासे त्यांना हे सोन्याचे अंडे सापडले.

समुद्राच्या तळाशी असलेल्या ज्वालामुखीजवळच वैज्ञानिकांना ही गूढ वस्तू सापडली. त्याचे नाव ‘टेरिफीक गोल्डन एग’ असे ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मागील महिन्यात ३० ऑगस्ट रोजी वैज्ञानिकांच्या या टीमला दक्षिण अलास्काच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर खोल समुद्रात हे गोल्डन एग सापडले आहे.

या गोल्डन एगमध्ये जिलेटीनसारख्या पदार्थाऐवजी रेशीम धाग्यांसारखी रचना आढळून आली आहे. त्यामुळे वैज्ञानिकही थक्क झाले आहेत. आता हे रहस्यमय गोल्डन एग प्रयोगशाळेत जपून ठेवण्यात आले असून त्याच्यावर सखोल संशोधन केले जाणार आहे.

हे गोल्डन एग नेमके काय आहे, याबाबत उलट सुलट तर्क व्यक्त केले जात आहेत. काहींच्या मते, ते प्राचीन काळातील एखाद्या प्राण्याच्या अंड्याचे कवच असू शकते. काही वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, ते समुद्राच्या तळाशी असलेल्या मृत स्पंजचे अवशेष असावेत.