Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून सरकारने कोणतेही राजकारण करू नये : रोहित पवार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत नियुक्त केलेल्या समितीची अजून एकही बैठक झालेली नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

सरकारने नुसते बोलून चालणार नाही. काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागेल, तसेच मराठा आरक्षणावरून सरकारने कोणतेही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात संवाद साधताना पवार म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलने, मोर्चेदेखील काढले आहेत. त्यांचे मराठा आरक्षणावरील आंदोलन थांबवताना एका समितीची नियुक्ती केली जाईल, तसेच समितीत मोठे अधिकारी असतील, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते.

मात्र ही समिती नियुक्त झाली किंवा नाही याबद्दल माहिती नाही. समिती स्थापन झाली असेल, तर समितीची अजून एकही बैठक झालेली नाही, असे पवार म्हणाले.

जरांगे-पाटील आणि कार्यकर्त्यांचेदेखील हेच मत आहे. पण, सरकार काहीच निर्णय घेत नाही. सर्व कार्यकर्ते या विषयावरून भावनिक असल्याने सरकारने याबाबत कसलेही राजकारण करू नये, असे आवाहनही पवार यांनी केले.

नारायण राणेंच्या आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याबद्दलही रोहित पवार म्हणाले, एक ज्येष्ठ नेताच असे बोलत असेल, तर कसे होणार. हे योग्य नाही. मराठा आरक्षणावर निश्चितपणे ठोस मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.