‘‘अहो, मी नगरसेवक आहे. मला जाऊ द्या न आत’’; मोदींच्या सभेत जाण्यासाठी नगरसेवकाचा हट्ट

 

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यामुळे पुण्यात आज मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोदींच्या सभेच्या दोन-तीन तास आधीपासून सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढू लागली.

एमआयटी’च्या मैदानापर्यंत पोचण्यापूर्वी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून प्रत्येक जण पुढे सरकत होता. यातच एका नगरसेवकाने चांगलाच गोंधळ घातला. ‘‘अहो, मी नगरसेवक आहे.

मला जाऊ द्या न आत’’ असे एमआयटी सभा स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणी पोलिसांना सांगत होता. त्यावर पोलिस म्हणाले, ‘‘तुम्ही एकटे नगरसेवक नाहीत तुमच्या आधीच चार नगरसेवक येऊन थांबले आहेत’’ असे चेक पोस्टवरील पोलिस अधिकाऱ्याने दिले.

त्यामुळे काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला. यादरम्यान सभेसाठी आलेल्यांमध्ये नगरसेवक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती,पत्रकार होते.

या सर्वांना बॅरिगेटस् लावून अडविण्यात आले. त्यापैकी एक नगरसेवक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी गर्दीतून वाट काढत पुढे आले.

ते म्हणाले, “साहेब, मी नगरसेवक आहे. मला आतमध्ये जाऊ द्या. माझ्याकडे पासदेखील आहे.” त्यावर अधिकारे म्हणाले, “साहेब, तुमच्यासारखे चार नगरसेवक या गर्दीत आहेत.

सभेच्या ठिकाणी जागा नाही. त्यामुळे आता सोडता येणार नाही.” या संवादानंतर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली.

त्यानंतर गर्दीच्या पाठीमागून जोरदार ढकला-ढकली सुरू झाली. त्या रेट्याने पोलिसांना ओलांडून गर्दी पुढे गेली. पुढच्या सुरक्षा चौकीवर पुन्हा या गर्दीला अडविले.

तेथे परत कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या शाब्दिक चकमक झाली. त्या वेळी आपल्या आईबरोबर मोदींना बघण्यासाठी आलेली महाविद्यालयीन तरुणी घाबरली.

“मला नाही बघायचं मोदींना. मला भीती वाटू लागली आहे. चल, आपण परत घरी जाऊ.” असे ती म्हणू लागली. पुरुषांच्या गर्दीत अडकलेल्या या दोन्ही महिलांना एका महिला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवलं. त्यांनी या गर्दीतून त्या दोघींना बाजूला काढलं. त्या तरुणीला दिलासा दिला आणि गर्दी कमी झाल्यानंतर पुढे पाठविले.