संचेती हॉस्पिटल तर्फे ऑर्थोपेडिक्ससाठी एआय आधारित ऑर्थोएआय सादर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : संचेती हॉस्पिटल तर्फे अनोखे ऑर्थोएआय हे जनरेटिव्ह एआय टूल सादर करण्यात आले आहे. यामुळे ऑर्थोपेडिक तज्ञांना व्यापक व समृध्द वैद्यकीय साहित्य उपलब्ध होईल.

ऑर्थोपेडिक तज्ञांसाठी कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित हा अद्वितीय आणि जगातील पहिलाच असा उपक्रम असून यामुळे आर्थोपेडिक तज्ञांना प्रकाशित झालेले असंख्य शोधनिबंध आणि व्हिडिओज एकाच ठिकाणी मिळू शकतील.

ऑर्थोएआयच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांसह संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.पराग संचेती,कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन व संचेती हॉस्पिटलच्या अ‍ॅकेडेमिक्स अ‍ॅन्ड रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ.अशोक श्याम,कन्सल्टंट आर्थोपेडिक सर्जन डॉ.नीरज बिजलानी आणि स्क्रीप्ट लेन्सचे व्यवस्थापकीय भागीदार रोहन लुणावत आणि अमित येरुडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हा उपक्रम म्हणजे पुणेस्थित आयटी कंपनी असलेल्या स्क्रीप्ट लेन्समधील आयटी तज्ञ व संचेती हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने गेल्या एक वर्षापासून केलेल्या व्यापक संशोधनाचा परिणाम आहे. ऑर्थोएआय हे एलएलएम आणि कॉग्निटिव्ह सर्च वर तयार केलेले व पुराव्यावर आधारित जनरेटिव्ह एआय मॉडेल असून यामुळे संबंधित व्हिडिओ व माहितीसाठ्यासह संदर्भासह प्रश्नांची उत्तरे मिळतात.

उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ.आर.ए.माशेलकर म्हणाले की, तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी अंर्तदृष्टी महत्त्वाची असते,पण त्यापेक्षा अधिक दूरदृष्टी महत्त्वाची असते. भारताने डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या असून डाटा वापरामध्ये आपण जगात आघाडीवर आहोत.

डिजिटल पेमेंटसच्या बाबतीत देखील आपण मोठी झेप घेतली आहे.आपण निर्माण केलेल्या आघाडीचा फायदा घ्यायला हवा. एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाबाबत अनेक आव्हाने आहेत आणि त्यासाठी बहुआयामी दृष्टीकोनाचा अवलंब केला पाहिजे.आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक,डाटा सायंटिस्ट आणि धोरणकर्त्यांनी यासाठी एकत्र आले पाहिजे.

या संकल्पनेबद्दल माहिती देताना डॉ.अशोक श्याम म्हणाले की,वैद्यकीयदृष्ट्या कोणताही निर्णय घेताना शल्यचिकित्सकाचा अनुभव,सध्याचे वैद्यकीय साहित्य आणि उपलब्ध माहिती आणि रूग्णाच्या गरजा या तीन महत्त्वाच्या बाबी असतात.

वैद्यकीय साहित्य आणि अद्ययावत माहिती ही खूप व्यापक आणि सतत बदलणारी असते,म्हणून ते मिळवणे आव्हानात्मक असते.याशिवाय वैयक्तिकरित्या शल्यचिकित्सकांचा अनुभव देखील भिन्न असतो. ऑर्थोएआय हे साधन या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पबमेडच्या माध्यमातून या माहितीचा शोध घेते तसेच ऑर्थो टीव्हीवर असलेल्या व्यापक माहिती साठ्याचा उपयोग करते.

त्यामुळे ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सकांना निर्णय घेताना याची मदत होऊ शकेल कारण यामध्ये अद्ययावत माहितीसाठा आणि ऑर्थो टीव्हीच्या माध्यमातून इतर शल्यचिकित्सकांचा अनुभव या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी मिळू शकतील.

एकंदर यामुळे उपलब्ध साधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो.एआय ही सतत विकसित होणारी संकल्पना असून आम्ही देखील ही संकल्पना विकसित करत राहू आणि त्यामध्ये सुरक्षितता आणि नैतिकतेला प्राधान्य देऊ.

डॉ.नीरज बिजलानी म्हणाले की, विशेषत: मधुमेह, संधिवात, उच्चरक्तदाब असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये व जन्मजात असामान्यता असलेल्या बालवयोगटातील किंवा कोणत्याही गुंतागुंतीच्या समस्या असलेल्या व्यक्तींकरिता ही संकल्पना उपयुक्त ठरेल.

विविध शल्यचिकित्सक गुंतागुंतीची स्थिती हाताळण्यासाठी विविध पध्दतींचा वापर करतात. ऑर्थो एआयच्या माध्यमातून इतर शल्यचिकित्सक कशा पध्दतीने गुंतागुंत हाताळतात हे कळण्यास मदत होईल.

याप्रसंगी बोलताना डॉ.पराग संचेती म्हणाले की, ऑर्थोपेडिक्स रूग्णांसाठी सर्वोत्तम सेवा प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश्य आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.