Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून राशीन पाणीटंचाईच्या विख्यात सापडले आहे.
या महिन्यात उष्णतेचा पारासारखा वरती सरकत असल्याने राशीन शहर व परिसरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. तसेच कर्जत तालुक्यातील राशीन शहराला पाणीपुरवठा करणारी खेड येथील पाणी पुरवठा योजना भीमा नदी कोरडीठाक पडल्याने योजना बंद पडली आहे. त्यामुळे राशीनमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
राशीन येथील २५००० लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राशीनला त्वरित पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राशीन सह परिसरातील वाड्या वस्त्या तहानलेल्या आहेत. पावसाळ्यात सरासरी एवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे परिसरातील पाण्याचे बहुतांशी स्रोत आटले आहेत.
नागरिकांनाच नव्हे तर जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. राशीनग्रामपंचायत हद्दीतील गवळराण सायकर वस्ती, भैरवनाथ तांबे दानवलेवस्ती, मोहिते वस्ती, राजेवस्ती, सपाटेवस्ती, ढगेवाडी, जानभरे वस्ती, कुरणाचीवाडी, सरोदे वस्ती याच ठिकाणी त्वरित टँकर सुरू करण्यात यावेत. राशीन शहरासाठी दररोज दोन लाख लिटर पाण्याची गरज आहे. त्यासाठी दररोज टँकरच्या दहा खेपा आवश्यक आहेत.
राशीन येथील भीषण पाणीटंचाईची तात्काळ दखल घेऊन प्रशासक रूपचंद जगताप, ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी राशीन ग्रामपंचायत मार्फत गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना पाठविण्यात आलेला टँकरचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच टँकर सुरू होतील.
तसेच भीमा नदी पात्रातील इलेक्ट्रिक मोटरीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.सध्या वाड्यावरती टँकरद्वारे एक लाख बत्तीस हजार लिटर पाणी मंजूर आहे. राशीन शहरासाठी दररोज दोन लाख लिटर पाण्याची मागणी केली आहे असे सांगितले.