Business Success Story: तरुणाने 20 व्या वर्षी कमावले बाराशे कोटी! वाचा आदित पालीचाची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Success Story:-तरुणाई म्हटले म्हणजे सळसळता उत्साह, मनामध्ये जे काही ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी लागणारी अफाट जिद्द  आणि मेहनत करण्याची ताकद, कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याची खंबीर इच्छाशक्ती इत्यादी गुणांचा मिलाफ  म्हणजेच तरुणाई म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आज आपण समाजामध्ये असे अनेक तरुण तरुणी पाहतो की ज्यांनी अगदी छोट्याशा कल्पनेतून त्यांचे एक मोठे विश्व निर्माण केलेले आहे. साहजिकच यशापर्यंत पोहोचताना त्यांना ही बाब सहज सोपी नक्कीच नसते. त्यामागे प्रचंड प्रमाणात असलेला कष्ट तसेच मेहनत व जबरदस्त ध्येयासक्ती यामध्ये कारणीभूत असते.

अशा प्रमाणे प्रचंड कष्ट घेऊन असे तरुण-तरुणी यशापर्यंत पोहोचतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आदित पालीचा या तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती काहीशी अशीच आहे. नेमका आदित पालीचा कोण आहे? त्यांनी इतक्या कमी वयामध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती कशी मिळवली? याबाबतची माहिती या लेखात घेऊ.

 आदित पालीचाची यशोगाथा

2001 यावर्षी आदितचा जन्म झाला. पुढे शिक्षण घेत असताना  पुढच्या शिक्षणासाठी त्याला कॉम्प्युटर सायन्समध्ये अभ्यास करायचा होता व त्याकरिता त्याला अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठांमध्ये जायचे होते. परंतु सगळीकडे कोरोनाचे सावट पसरल्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही व त्यामुळे त्याने वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणाला रामराम ठोकला व काहीतरी व्यवसाय करावा असे निश्चित केले.

आदित पालीचाचा मित्र कैवल्य वोहराच्या मदतीने 2021 या वर्षी झेप्टो  या कंपनीची स्थापना केली. जर आपण या कंपनीचे काम पाहिले तर ती किराणा मालाचे वितरण करण्यासाठी प्रामुख्याने ओळखली जाते. जेव्हा कोरोना कालावधीमध्ये सगळीकडे लॉकडाऊन होते अशा परिस्थितीमध्ये दहा मिनिटांमध्ये ग्राहकाच्या घरी किराणा सामान पोचवण्याची कल्पना आदित व त्याचा मित्र कैवल्य यांनी ओळखली व ही कल्पना पुढे यशस्वी ठरली.

या कंपनीच्या माध्यमातून त्यांचा हा व्यवसाय वेगाने वाढू लागला व एकाच महिन्यात त्यांच्या या नावीन्यपूर्ण स्टार्टअपचे व्हॅल्युएशन दोनशे दशलक्ष डॉलर वर पोहोचले. जर आपण 2021 या वर्षाचा विचार केला तर कंपनीच्या माध्यमातून दहा लाख ऑर्डर स्वीकारल्या गेल्या व त्या ऑर्डर वेळेत ग्राहकांच्या घरी पोहोच देखील केल्या. ग्राहकांना पुरवलेल्या उत्तम सेवेमुळे ग्राहकांचा देखील या कंपनीला प्रतिसाद मिळाला व झेप्टोची स्थापना झाल्यानंतर अवघ्या पाचच महिन्यांमध्ये या कंपनीचे मूल्य 570 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढले.

 कसे आहे झेप्टोचे स्वरूप?

या कंपनीचे हेड ऑफिस मुंबईमध्ये असून सध्या ती भारतातील दहा मोठ्या शहरांमध्ये काम करत आहे. सध्या सुमारे एक हजार लोक या कंपनीत काम करत असून सध्या झेप्टोच्या माध्यमातून भाजीपाला, किराणामाल आणि फळे इत्यादी सामानासोबतच 3000 विविध उत्पादनांची घरपोच सेवा देण्यात येते.

या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तूची ऑर्डर केली तर कंपनीच्या माध्यमातून दहा ते 16 मिनिटाच्या आतमध्ये वस्तू तुमच्या घरी पोहोचते. सध्या दिवसेंदिवस या कंपनीचा व्यवसाय वाढताना दिसून येतो. आज या कंपनीचे मूल्य अकरा हजार सहाशे कोटी रुपये इतके असून त्यामधून आदित पालीचाने विसाव्या वर्षी बाराशे कोटी रुपये कमावले आहेत व त्याचा सह संस्थापक आणि मित्र कैवल्य वोराने देखील 1000 कोटी रुपयांचे निव्वळ संपत्ती मिळवली आहे.

यावरून आपल्याला दिसून येते की जर आपली काहीतरी करण्याची इच्छा असेल व ती इच्छा पूर्णत्वास न्यायची असेल व कष्ट करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित.