तेलबियांची लागवड आणि त्यातून तेल निर्मिती करण्याचा उभारला व्यवसाय! हा तरुण शेतकरी कमवत आहे लाखो रुपये, वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळीवारां सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होताना आपल्याला दिसून येत आहे.

या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान बदलावर आधारित पीक पद्धती  व पारंपारिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे. परंतु शेती जर परवडण्याजोगी करायचे असेल तर शेतीसोबत एखादा जोडधंदा किंवा शेतीवर आधारित उद्योगाची उभारणी करणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे

व एवढेच नाही तर ती काळाची गरज आहे.शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या अनुषंगाने बघितले तर अनेक उद्योगांची नावे आपल्याला सांगता येतील. याच पद्धतीने भंडारा जिल्ह्यात असलेल्या लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील अमित बोरकर या तरुण शेतकऱ्याने मागील दोन ते तीन वर्षापासून सूर्यफूल व करडई लागवडीला सुरुवात केली व त्यासोबत तेल निर्मिती उद्योग उभारून आर्थिक समृद्धी साधली आहे.

 तेलबियांच्या लागवड आणि तेल निर्मिती व्यवसायातून साधली आर्थिक समृद्धी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात गोंडेगाव हे गाव असून या ठिकाणी राहणारे अमित बोरकर या तरुणाने मागील दोन ते तीन वर्षापासून सूर्यफूल व करडई लागवडीला सुरुवात केली. विशेष म्हणजे गोंडेगाव परिसरामध्ये अशाप्रकारे तेलबिया लागवडीचा प्रयोग हा प्रथमच होता.

या माध्यमातून अमित यांनी जे काही उत्पन्न मिळवले ते इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणादायी ठरले. परंतु अमित बोरकर यांनी तेलबियांचे लागवड करून न थांबता त्याही पुढे पाऊल टाकत कृषी विभाग व कृषी विद्यापीठातून काही माहिती घेत व शास्त्रोक्त पद्धतीने लागवड तर केलीच

परंतु त्यानंतर मात्र महाडीबीटीच्या माध्यमातून तेल काढणीचे यंत्र मिळवले व त्या माध्यमातून स्वतःच तेल काढून बाजारात देखील विक्री करता उपलब्ध केले. त्यामुळे परिसरातील लोकांना शुद्ध तेल तर खाण्यासाठी मिळालेच

परंतु इतर शेतकऱ्यांना देखील तेल काढून देण्याची सुविधा अमित बोरकर यांनी उपलब्ध करून दिली. या सगळ्या त्यांच्या प्रेरणामुळे आता गोंडेगाव परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल तसेच करडई, जवस व मोहरी सारख्या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहे.

 तेलाचे ब्रँडिंग करून केली जाते विक्री

अमित बोरकर यांनी स्वतःच्या शेतामध्ये जे काही तेलबियांचे उत्पादन घेतले त्या तेलबियांपासून स्वतःच्या तेल घाण्यामध्ये तेल तयार करून शुद्ध तेल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले. विशेष म्हणजे ग्राहकांच्या माध्यमातून देखील या तेलाला खूप मोठी पसंती दिली गेली.

त्याचीच परिणीती म्हणून आज अमित बोरकर यांच्या घरूनच तेलाची विक्री मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे. इतकेच नाही तर ते आता इतर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तेल बियांवर देखील प्रक्रिया करून तेल निर्मिती करून त्या माध्यमातून आर्थिक नफा मिळवत आहेत. अशा पद्धतीने तेलबिया लागवड आणि तेल निर्मिती यातून त्यांनी  चांगली आर्थिक समृद्धी मिळवली आहे.