नगर दक्षिण मतदारसंघात शरद पवार की अजित दादा कोणाचा पक्ष अधिक वजनदार ? निलेश लंके यांनी बाजी पलटली तर कोणाकडे किती आमदार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर नगर दक्षिणमध्ये अजित दादा यांच्या गटात दोन आमदार आणि शरद पवार यांच्या गटात दोन आमदार आहेत. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका अगदी बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच अजितदादा यांच्या गटाला मोठा धक्का बसणार अशा चर्चा सुरू आहेत.

पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित दादांना सोडचिट्ठी देतील असे म्हटले जात आहे. खरेतर निलेश लंके यांनी नगदक्षिणेतून लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची आगेकूच देखील सुरू झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांच्या धर्मपत्नीने अर्थातच सौ राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभेत शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला होता.

दरम्यान लंके यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगर शहरात शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या महानाट्याला महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. बीजेपीचे आमदार राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी देखील या महानाट्याला हजेरी लावली.

एकंदरीत या महानाट्याला बीजेपीतील विखे विरोधी आणि महायुतीमधील तसेच महाविकास आघाडी मध्ये अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली आहे. यामुळे या महानाट्याच्या आडून निलेश लंके यांनी लोकसभेसाठी ग्राउंड तयार करण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र महायुतीमध्ये नगरदक्षिणेची जागा ही बीजेपीच्या वाट्याला जाते.

त्यामुळे अजित दादा यांच्या गटाकडून निलेश लंके यांना उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य भासते. अशा परिस्थितीत निलेश लंके हे आगामी लोकसभेच्या आधीच शरद पवार यांच्या गटात सामील होतील, अशा चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. जर या चर्चा खऱ्या ठरल्या आणि निलेश लंके यांनी अजितदादा यांच्या गटाला राम-राम ठोकला तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात घड्याळाला तुतारी जड भरणार असे दिसत आहे.

निलेश लंके यांची साथ मिळाल्यास शरद पवार यांचा पक्ष नगर दक्षिण मतदार संघात अधिक मजबूत होणार आहे. दुसरीकडे अजितदादा यांच्या पक्षाची दक्षिणेतील स्थिती फारशी चांगली नाहीये. नगर दक्षिणेतील बहुतांशी तालुक्यात अजित दादा यांच्या पक्षाला अध्यक्ष देखील नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

नगर जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार अजितदादांच्या गटात पण…

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील एकूण सहा पैकी चार आमदारांनी अजितदादांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे आणि निलेश लंके हे चार आमदार अजितदादा यांच्या गटात आहेत. यातील किरण लहामटे आणि आशुतोष काळे यांची विधानसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते.

दरम्यान, आता निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडणार अशा चर्चा आहेत. खरेतर महाविकास आघाडीकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणूक लढू इच्छिणारे निलेश लंके शरद पवार यांच्या गटात जातील अशा चर्चा आहेत. जर असं घडलं तर दक्षिणेत फक्त संग्राम जगताप एकमेव आमदार अजितदादा यांच्या गटात राहतील.

साहजिकच, त्यामुळे अजितदादा यांच्या गटाची दशा शरद पवार यांच्या गटाच्या तुलनेत दयनीय होणार आहे. जर निलेश लंके यांनी बाजी पलटली तर दक्षिणेत शरद पवार यांच्या गटात रोहित पवार प्राजक्त तनपुरे आणि निलेश लंके असे तीन ताकतीचे आमदार असतील.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहर, राहुरी, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा असे आठ तालुके आहेत. पण श्रीगोंदा वगळता अन्य सात तालुक्यांमध्ये अजितदादा यांच्या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा नेमले गेलेले नाहीत. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षात नगर दक्षिणेतील या तालुक्यांमध्ये अनेक ताकतीचे नेते पाहायला मिळतात.