Jayakwadi Dam : जायकवाडीत पुरेसे पाणी असताना नगर-नाशिकच्या धरणांतून सोडू नका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jayakwadi Dam : चालू वर्षी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात सरासरीच्या ४२ टक्केच पाऊस झालेला असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस झालेला आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा देखील समाधानकारक आहे. याउलट गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे.

या भागात चिंताजनक परिस्थिती असून समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर- नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नका, अशा आशयाचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्र. कार्यकारी संचालक विजय घोगरे यांना दिले आहे.

आमदार काळे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह औरंगाबाद येथे जाऊन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे प्र. कार्यकारी संचालक विजय घोगरे यांची भेट घेतली. त्यांना गोदावरी कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील दुष्काळी परिस्थिती समजावून सांगितली व जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे होत लाभक्षेत्रावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.

आमदार काळे म्हणाले, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा पर्जन्यछायेत येत असून गोदावरी उजवा व डावा तट कालव्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर मतदारसंघातील शेती, पीण्याचे पाणी व उद्योग अवलंबून आहेत.

नाशिक येथील धरणांवर बिगर सिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतीसाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात तुट निर्माण झालेली असताना अशा परिस्थितीत समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडीसाठी पाणी सोडले जात असल्यामुळे गोदावरी कालव्यांचे लाभक्षेत्र, फळबागा, उद्योग धंदे यांचेवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने नवीन समितीची नेमणूक केलेली आहे. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. अशा परिस्थितीमध्ये कालबाह्य झालेल्या गोदावरी अभ्यास गट अहवाल सन २०१३च्या आधारे प्राधिकरणाने दि. १९ सप्टेंबरच्या आदेशानुसार पाणी सोडण्याची कार्यवाही करणे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर अन्याय करणारे आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी काकासाहेब जावळे, सोमनाथ चांदगुडे, ज्ञानदेव मांजरे, आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, बाळासाहेब बारहाते, अशोकराव काळे, संजय आगवण, राजेंद्र खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, शिवाजीराव देवकर, रामदास केकाण, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, कृष्णा आढाव आदी उपस्थित होते.