Mahadev Jankar : आता गरीबाचं ‘पोरगं देखील आमदार-खासदार झालं पाहिजे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadev Jankar :- आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचं पोरगं खासदार, मोठ-मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य हे कुठपर्यंत चालणार? आता गरीबाचं ‘पोरगंदेखील आमदार-खासदार झालं पाहिजे, याकरिता रासपा प्रयत्न करणार असून, त्यासाठी घराणेशाही झुगारून रासपात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज यात्रा लोकसभा क्षेत्रात २० जुलैपासून सुरू आहे. राहुरी शहरात या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना जानकर म्हणाले, की सध्या राजकारण्यांनी जाती-जातीत तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय ‘पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे.

सर्व लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार !
जाती-धर्मातून जनतेचे प्रश्‍न सुटणार नाहीत, तर तरुणांना रोजगार व शेतीला वीज आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत याबाबत जे करायला पाहिजे, ते नेत्यांनी केले नाही. काँग्रेस, भाजपा व इतर पक्ष जे देऊ शकले नाहीत, ते यापुढे राष्ट्रीय समाज पक्ष देईल, म्हणून आम्ही सर्व लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार
राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच बसस्थानकाचा अनेक वर्षापासून भीजत पडलेल्या प्रश्‍नासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलुन हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.