जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन उपकेंद्र इमारतीचे बांधकाम करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५५.५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर याबाबतीत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत सुजय विखेंनी मांडले. आरोग्य क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याकडे अहमदनगर जिल्ह्याची वाटचाल सुरू झाली असून येणाऱ्या काळात सर्वांनाच आपल्या जवळील उपकेंद्रात उपचार घेणे शक्य होईल असे मत खासदार विखे पाटील यांनी मांडले.

तसेच त्यांनी सदरील निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्दिले, आमदार राम शिंदे व आमदार बबनदादा पाचपुते, यांचे मनःपूर्वक आभार मानले.