गावरान आमराया नामशेष होण्याच्या मार्गावर ! दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव कसा कळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marathi News : गावरान आंब्याच्या झाडांची कित्येक वर्षापासून मोठ्‌या प्रमाणात कत्तल होत आहे. परिणामी गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी ग्रामीण भागात मुबलक मिळणारा गावरान (गावठी) आंबा मिळेनासा झाला आहे.

वाड-वडिलांनी लावलेली ‘आमराई’ आज दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे आजच्या पिढीला दगडाने आंबा पाडून खाण्याची मजा काय असते, याचा अनुभव मिळेनासा झाला आहे.

प्रत्येक गावामध्ये पूर्वी आमराई असायची. काही गावांत अनेक आमराया असायच्या. या देशी आंब्यांची लागवड करून आपल्या वाड-वडिलांनी काळजी घेतली. ही झाडे वाढवली; परंतु काळाच्या ओघात हे आंबे कमी झाले.

अनेकांनी या झाडांची कुऱ्हाडीने कत्तल केली. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या आंब्याची झाडे तोडता येत नाही म्हणून कृत्रिमरित्या केमिकलचा वापर करून वाळवून ती तोडून टाकली. त्यामुळे या आमराया दिसेनाशा झाल्या आहेत. जशा या आमराया नष्ट झाल्या, तशा आठवणीही विरळ होत चालल्या असून नैसर्गिक वैविध्यही गायब होत असल्याचे दिसत आहे.

या अमराया म्हणजे निसर्ग समृदद्धतेचा उत्कृष्ट नमुना होत्या. या आमरायांतून कोकिळेचा आवाज सर्वांनाच आकर्षित करीत असे; तो आवाज आज हरवला आहे. या आमरायांच्या परिसरात कायम माकडांचा मुक्काम असे.

ही हक्काची घरे नष्ट झाल्याने माकडेही दुसरा निवारा शोधत इतरत्र निघून गेली आहेत. आमराई म्हणजे लहान मुलांचे खेळण्याचे हक्काचे ठिकाण. ही लहान मुलं आख्खा उन्हाळा या आमराईत घालवत असायची. येथे वेगवेगळे खेळ असायचे. हे खेळ आता होताना दिसत नाही.

नातवंडांना आंबा खाण्यासाठी मिळावा म्हणून आजोबा आपल्या शेतात चांगल्या जातीचे गावरान आंब्याची लागवड करुन त्यांची जोपासना करीत असत; परंतु हा उपक्रम बंद पडला.

परिणामी आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गावरान आंब्याची जागा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या परराज्यातील आंब्यांनी घेतली आहे. त्यामुळे गावरान आंब्याची लागवड करण्यासाठी शासनाने योजना राबवण्याची गरज आहे.