कौतुकास्पद! शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती, एकेकाळी मजुरी करणाऱ्या कुटुंबाला शेळीपालनाने दिले आर्थिक स्थैर्य, पहा ही संघर्षमय यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goat Farming : महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, मजूर लोक आपल्या कर्तुत्वातून कायमच आपलं वेगळं पण सिद्ध करत असतात. विपरीत परिस्थितीमध्येही नवनवीन प्रयोग करून इतरांसाठी प्रेरक असं काम करतात. दरम्यान आज आपण भंडारा तालुक्यातील मौजे बासोरा येथील एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

ज्यांनी अशाच विपरीत परिस्थितीमध्ये वेगळं पण सिद्ध केलं असून आजच्या घडीला शेती पूरक व्यवसाय शेळीपालनातून आर्थिक प्रगती साधली आहे. दसाराम कांबळे व कुटुंब यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ एक एकर शेत जमीन आहे. अत्यल्प भूधारक आणि पाच लोकांचं कुटुंब यामुळे उदरनिर्वाहाचाच प्रश्न ऐरणीवर होता. एवढ्याशा जमिनीत पाच लोकांचं पोट कस भरणार हा मोठा प्रश्न कांबळे कुटुंबापुढे होता.

मात्र काहीतरी वेगळं करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगण्याची जिद्द असली तर यासाठी मार्गदेखील सापडतो. याच पद्धतीने कांबळे कुटुंबाला देखील मार्ग सापडला. दसाराम हे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शेतमजुरी करत. मात्र, आपल्या धन्याला संसाराचा गाडा हाकण्यासाठी काहीतरी मदत करायची, पण पैसे घरला येतील म्हणून आपणही काहीतरी करायचं याच हेतून त्यांच्या धर्मपत्नीने 2013 14 मध्ये दहा हजार रुपयाचं कर्ज घेऊन तीन शेळ्या विकत आणल्या.

त्यांना हे कर्ज बचत गटातून उपलब्ध झालं होतं. सुरुवातीला तीन शेळ्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय पाहता पाहता एका वटवृक्षाचे स्वरूप घेऊ लागला. या वर्षभरात दहा शेळ्या या कुटुंबाकडे तयार झाल्यात. शेळ्या झाल्यात मात्र शेळी साठी निवार्याचा प्रश्न ऐरणीवर आला. ऊन, वारा, थंडी, पाऊस, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पशुधनाला हानी होण्याची भीती त्यांना होती. मात्र अशातच शेळीपालनात या कुटुंबाने केलेली धडपड पाहून गावातील रोजगार सेवकाने मनरेगाच्या माध्यमातून शेळीचे शेड उभारण्यासाठी अर्ज मागितले.

अशा पद्धतीने रोजगार सेवक, सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी यांच्या मदतीने 2015 च्या डिसेंबर मध्ये शेळीपालनासाठी शेड उभं झालं. त्यामुळे शेळ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न तूर्तास मिटला. यामुळे ऊन वारा पाऊस यापासून शेळ्यांचे संरक्षण तर झालेच शिवाय लेंडी खत देखील मुबलक प्रमाणात साठू लागले. याच्या विक्रीतूनही त्यांना अधिकच उत्पन्न मिळू लागलं. या व्यवसायातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली, त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी मुलांचे शिक्षण केले, त्यांची लग्न केली एक पक्क घर देखील बांधलं. मात्र शेळ्यांची संख्या वाढली आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा कांबळे कुटुंबाला भेडसाववू लागला.

पुन्हा त्यांना शेळी साठी उभारलेले शेड कमी पडू लागल्याने काही शेळ्या उघड्यावर बांधाव्या लागल्या. अशातच शेळीमध्ये एक साथीचा रोग आला. यामुळे कांबळे कुटुंबांच्या 45 शेळ्या वारल्या. कांबळे कुटुंबावर मोठे संकट आल. यामुळे आर्थिक अडचण तर आलीच मात्र मानसिक वेदना या आर्थिक अडचणी पेक्षा अधिक होत्या. अशा परिस्थितीत ज्या शेळीपालन व्यवसायाने आपल्याला पक्क घर दिल, जीवन जगण्यासाठी कमाईचे साधन दिल त्या शेळ्यांसाठी आपण पक्क शेड तयार करायचं असं कांबळे कुटुंबाने ठरवलं.

या अनुषंगाने शेळीपालन व्यवसायातून साठवलेले पैसे आणि बँकेतून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कांबळे कुटुंबाकडे दोन लाख रुपये रोख रक्कम होती आणि दोन लाखाचे कर्ज विजया बँक भंडारा येथून घेण्यात आले. चार लाख रुपयाचा निधी जमा करून त्यांनी शेळीसाठी प्रशस्त असं शेड उभारलं. दसाराम यांचा मुलगा अस्तिव्यंग असल्यामुळे इतर मुलांसारखं शिक्षण आणि नोकरी करण्यास अक्षम आहे. मात्र त्याला शेळीपालन व्यवसायाची मोठी गोडी आहे.

तो आता आई-वडिलांनी सुरू केलेले हे शेळीपालन योग्यरित्या सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. 2020-21 पासून कांबळे कुटुंब नव्याने उभारलेल्या या शेडमध्ये शेळीपालन सोबतच कुकूटपालन व्यवसाय देखील करू लागले आहे. निश्चितच इच्छा असली तर मार्ग हा सापडतोच मात्र त्यासाठी कष्ट घेण्याची उमेद ही लागते. कांबळे कुटुंबाकडे कष्ट करण्याची उमेद होती, विपरीत परिस्थितीमध्ये देखील लढण्याची जिद्द त्यांच्यात होती आणि हेच तर मग खऱ्या यशाचे गमक होत.

कांबळे कुटुंबांप्रमाणे जर इतरांनी देखील हे यशाचा गमक गवसलं त्या अनुषंगाने धडपड केली तर निश्चितच कोणत्याही व्यवसायात कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या गिरीशिखरावर पोहोचल जाऊ शकत. कांबळे कुटुंबांनी हे दाखवून दिला आहे. या कुटुंबाने केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींसाठी आदर्श रोवला आहे.