Gharkul Yojana: काय आहे यशवंतराव चव्हाण घरकुल योजना? कोणाला मिळतो या योजनेचा लाभ? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana :- प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न प्रत्येकालाच पूर्ण करता येते असे नाही. कारण घरांच्या वाढत्या किमती किंवा घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे खरं बांधायला खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो.

त्यामुळे समाजातील बऱ्याच घटकातील व्यक्तींना इच्छा असून देखील घर बांधणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा बेघर असलेल्या व्यक्तींसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घरकुल योजना राबवल्या जातात.

अशा योजनांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते व समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना स्वतःचे घर उपलब्ध होते. या योजनांमध्ये पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना यासारख्या योजना खूप महत्त्वपूर्ण अशा आहेत.

त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना होय. या योजनेचे नेमके स्वरूप कसे आहे व या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळतो? त्यासंबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना

ही योजना राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत( घरकुल) योजना या नावाने ओळखले जाते व ही योजना प्रामुख्याने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. या योजनेचा लाभ समाजातील भटक्या विमुक्त जाती/ जमातीच्या कुटुंबांना दिला जातो.

या योजनेच्या माध्यमातून विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच गुंठे जमीन दिली जाते व इतकेच नाही तर २६९ चौरस फुटाचे घर देखील बांधून दिले जाते. या योजनेचे उद्दिष्ट पाहिले तर प्रामुख्याने भटक्या जमातींचा विकास करणे व त्यांचे राहणीमान उंचावणे,

अशा जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे व त्यांच्या जीवनामध्ये स्थिरता मिळवून देणे व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल व त्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना महत्वपूर्ण आहे.

या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

या योजनेचा लाभ गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक व विमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक यांना मिळतो.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठीच्या अटी नेमक्या काय आहेत?

1- यामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

2- अर्जदार हा प्रामुख्याने महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

3- अर्जदाराकडे स्वतःचे घर नसावे. अर्जदार हा कच्च्या घरामध्ये किंवा झोपड्यांमध्ये राहणारा असावा.

4- या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच मिळेल.

5- लाभार्थी हा भूमीहीन असावा.

6- लाभार्थी साधारणपणे सहा महिन्यांहून अधिक काळ एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

7- योजना ग्रामीण भागासाठी लागू असेल.

या योजनेअंतर्गत कुणाला प्राधान्यक्रम दिला जातो?

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत प्रामुख्याने गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लोक, अपंग तसेच महिला व पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिक, दारिद्र्य रेषेखाली कुटुंब, विधवा तसेच परीतक्ता यांना प्राधान्य क्रमाने लाभ दिला जातो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा?

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये यासाठी अर्ज करू शकतात.