जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही उपाशीच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात गावपातळीवर ग्रामपंचायत कर्मचारी जोखीम घेऊन आपले योगदान देत आहे. कोरोना परतवून लावण्याच्या युध्दात ग्रामपंचायत कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असताना त्यांनाच आपल्या वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश कर्मचार्‍यांना फेब्रुवारीपासून वेतन देण्यात आले नसून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे थकित वेतन तातडीने अदा करुन त्यांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) व अहमदनगर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे यांनी दिली.

तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुचनेनुसार ग्रामविकास विभागाने वेतन करांच्या वसुलीशी न जोडता किमान वेतन पुर्णत: देण्याचे परिपत्रक दि.28 एप्रिल रोजी निर्गमीत केले असून, या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावात फवारणी करणे, गावा बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंद घेणे व इतर कामे देखील करीत आहे.

केवळ 1 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता, चौदाव्या वित्त आयोगापासून कोरोनाचे काम करत असल्यामुळे दिले आहेत. ते सुद्धा जिल्ह्यात काही ठिकाणी सरपंच किंवा ग्रामसेवक यांचे सह्या न झाल्याने प्रलंबित आहे. फेब्रुवारी व मार्चचा पगार अद्यापही मिळालेला नाही. एप्रिल महिना संपत आला असून, कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत आहे.

पगार ऑनलाइन असल्यामुळे बँकेच्या खात्यात जमा होते. यामुळे ग्रामपंचायत कडून उचल देखील घेता येत नसल्याने, जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांवर अक्षरशा उपासमारीची वेळ ओढवली आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल यांना देखील या परिस्थितीची कल्पना देऊन तातडीने ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकित वेतन अदा करण्याची मागणी करण्यात आल्याचे अ‍ॅड.कॉ.सुधीर टोकेकर यांनी सांगितले आहे.

तर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अंगावर कर वसुलीची सर्वस्वी जबाबदारी आहे. कर वसुली न झाल्यास त्यांचे वेतन देखील कपात केले जात असे. मात्र कोरोनाच्या कळात कर वसुली होणार नसल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सुचनेनुसार ग्रामविकास विभागाने वेतन करांच्या वसुलीशी न जोडता ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन कपात न करता पुर्ण अदा करण्याचे सुचित केले असून, या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. येत्या चार दिवसात कर्मचार्‍यांचे थकित वेतन अदा न झाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment