शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना ‘तो’ निर्णय घ्यावाच लागला!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- अद्यापही कोरोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. घराबाहेर पडताना चेहर्‍यास मास्क बांधावा.

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. घरातील वृद्ध, आजारी आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. विशेषता शहरी भागात नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढेल, अशा प्रकारची कृती नागरिकांनी टाळावी.

स्वताच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि प्रशासन घेत असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तहसीलदारांना तसेच महानगरपालिका यंत्रणेला दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दिलेल्या पूर्वकाळजीविषयक सूचना आणि प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन काही जणांकडून होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत भर पडताना दिसत आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहर्‍यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून आता दंडाची रक्कमही पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

याशिवाय, शासकीय कार्यालयात आता मास्क नाही-प्रवेश नाही, याची कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोबर मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात त्यासाठीची यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

प्रत्येक तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रात कोविड केअर सेंटर सुरु करण्यासंदर्भातील सर्व तयारी दोन दिवसात पूर्ण करावेत. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव आला तर त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, अशा सूचना डॉ. भोसले यांनी दिल्या. कोविड केअर सेंटरप्रमाणेच कोविड हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित करण्यासाठीची सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे ते म्हणाले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर