ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ४० लाखांची मागितली खंडणी, तिघांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश बाळासाहेब सगळगीळे, अनिता दिनेश सगळगीळे, व प्रतिभा बाळासाहेब सगळगीळे (सर्वजण रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत.

खडांबे खुर्द येथे ३१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, विनायक राजेंद्र गर्जे (दोघेही रा. खडांबे खुर्द) व बापू रोहिदास ससाने (रा. गुंजाळे) यांच्यासमवेत आरोपींचे भांडण झाले.

आरोपीच्या कुटुंबातील एका महिलेचे गावातील दोन जणांशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा करून, समाजात बदनामी केल्याचा आरोप आरोपींनी केला. त्यावरून भांडण विकोपाला गेले. आरोपींनी राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

त्यानंतर हरिश्चंद्रे, गर्जे व ससाणे काम करीत असलेल्या ट्रॅक्टर मालक भगवान गोवर्धन कल्हापुरे (रा. खडांबे खुर्द) यांच्या मोबाईलवर फोन करून, तिघांनी समाजात आमची बदनामी केली. त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून, त्यांना जेलमध्ये पाठवू. अशी धमकी दिली.

हे प्रकरण मिटविण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ट्रॅक्टर मालक कल्हापुरे यांनी “त्यांची एवढे पैसे देण्याची आर्थिक परिस्थिती नाही.” असे सांगितल्यावर “त्यांनी दोन एकर जमीन विकून आम्हाला पैसे द्यावेत.” अशी आरोपींनी मागणी केली.

याप्रकरणी रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे (वय २४, धंदा – ट्रॅक्टर चालक) यांच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करीत आहेत.