चाळीस वर्षानतर उतरला महिलांच्या डोक्यावरील हंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कान्होबावाडी येथील महिलांना मागील ४० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती; परंतु करंजी ग्रामपंचायतने येथील ३० कुटुंबांना सार्वजनिक

पाईपलाईन करून प्रत्येक घरी स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्याने कान्होबावाडी येथील महिलांचा चाळीस वर्षानंतर डोक्यावरील हंडा उतरला, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केली आहे.

करंजी गावच्या सरपंच नसीम रफिक शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, ग्रा.पं. सदस्य बंटी अकोलकर यांनी कान्होबावाडी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी गावातील सार्वजनिक विहिरीमध्ये सातवड येथून पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी आणण्याची व्यवस्था केली.

त्यानंतर ग्रामपंचायतने या विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार बसवली. जलजीवनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातून ३० कुटुंबांना नळ कनेक्शन देऊन बुधवारी या कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.

आणि खऱ्या अर्थाने या गावच्या महिलांनी आनंद साजरा केला असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर यांनी व्यक्त केली आहे. वाडी-वस्तीवर प्रशासनाकडून टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली असली तरी वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबांना सार्वजनिक नळाद्वारे पाणी देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सरपंच नशीम शेख यांनी सांगितले.

या वेळी ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर, रमेश शिंदे, राजाराम अकोलकर, बबू अकोलकर, आण्णासाहेब अकोलकर, लक्ष्मीकांत अकोलकर, उद्धव अकोलकर, राजू शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.