अहमदनगरचे नामकरण कशासाठी ? अजित पवारांनी एका शब्दात संगितले उत्तर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून टीका होऊ लागली.

यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर येईल आणि धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात आल्याची शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

पुण्यात अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या. त्याबद्दल एक नाव घेऊन प्रस्ताव आल्यास राजकीय व्यक्ती म्हणून आम्ही स्वागत करतो.

किंबहुना तीच भूमिका असते. सद्यःस्थितीत अहमदनगरचे नामांतर व्हावे, यासाठी कोणतेही आंदोलन सुरू नव्हते. त्याबाबतची मागणी नव्हती. मात्र, सध्याच्या सरकारमधून महापुरुषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये करण्यात आली.

त्यामध्ये वाचाळवीरांची आणखी भर पडली, यापूर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो पूर्णत्वास न गेल्याने सरकारने नामांतरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. तसेच लोकांचे मन वळविण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे.

अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळाले, याचे स्वागत आहे. महापुरुषांच्या नावे शहर ओळखले जावे, यामध्ये कोणतेही दुमत नाही. महापुरुषांचे स्मरण तसेच त्यांच्या विचाराचा प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र, ते करत असताना राजकीय स्वार्थ समोर असू नये, असेही ते म्हणाले.

अदानी नेमक्या कोणत्या कारणासाठी भेटले, हे सांगता येत नाही : अजित पवार

उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशा वेळी अदानी हे नेमक्या कोणत्या कारणासाठी भेटले, हे सांगता येत नसल्याचे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शुक्रवारी पुण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अदानी आणि पवार या प्रकरणातून काढता पाय घेतला. अदानी उद्या शरद पवारांच्या घरी राहायला गेले, तरी आमचा त्यांना विरोध करायचा काय संबंध, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. अदानी – हिंडेनबर्ग प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख आणि अदानी यांच्यातील ही दुसरी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार म्हणाले, गौतम अदानी यांचे देशभरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. महाराष्ट्रातही त्यांचे काही प्रकल्प सुरू आहेत. ते नेमक्या कोणत्या कारणासाठी शरद पवार यांना भेटले, हे आपल्याला माहीत नाही असे ते म्हणाले.