अहमदनगर नाही आता ‘अहिल्यानगर’ म्हणायचं ! पुण्यातील ‘या’ तालुक्याचेही नाव बदलले, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अठराव्या लोकसभेसाठी केव्हाही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणूक आयोगाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की, लगेचच आचारसंहिता लागू होईल, हेच कारण आहे की राज्यातील शिंदे सरकारने लागोपाठ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

11 मार्चला राज्य मंत्रिमंडळाची अशीच एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. 13 मार्च 2024 ला देखील राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.

शिंदे सरकारच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत अहमदनगर शहराचे अहिल्यानगर असे नामकरण करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. एवढेच नाही तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नवीन नामकरण करण्यात आले आहे. वेल्हे तालुका आता राजगड तालुका म्हणून ओळखला जाणार आहे.

अहमदनगर नव्हे आता ‘अहिल्यानगर’ !

अहमदनगर शहराचे नाव अहमद निजामशाहच्या नावावर पडले होते. 15 व्या शतकात निजामशाहने अहमदनगरची स्थापना केली होती. तेव्हापासून अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात आले नव्हते. पण आता शिंदे फडणवीस पवार सरकारने अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले आहे. खरेतर अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या नामांतराची मागणी करतांना आणि महापालिकेने ठराव करताना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” असे नाव सुचवले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नवीन नामकरण केले जाईल अशी घोषणा केली होती. मात्र मंत्रिमंडळाने निर्णय घेताना साधेसोपे नाव असावे म्हणून ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान अहमदनगरच्या नामकरणासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे म्हटले आहे.

यानिर्णयाने अहमदनगर शहर, जिल्ह्यासह राज्यातील 13 कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली असल्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी यावेळी म्हटले आहे. आमदार संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका निभावली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

वेल्हे तालुका आता राजगड म्हणून ओळखला जाणार

अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे देखील नामकरण करण्यात आले असून हा तालुका आता राजगड म्हणून ओळखला जाणारा आहे. वेल्हे तालुक्यात असलेल्या राजगड या किल्ल्यावरून तालुक्याला हे नाव देण्यात आले असे.

खरेतर तालुक्याचे नाव बदलले गेले पाहिजे या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा पाठपुरावा केला होता. दरम्यान, आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. खरंतर तालुक्याचे नवीन नामकरण व्हावे यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी वेल्हे तालुक्याचे नाव बदलले गेले पाहिजे याबाबतचा ठराव देखील केला होता.

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील याबाबतचा ठराव मंजूर झालेला होता. पुणे विभागीय आयुक्तांकडूनही याबाबतचा प्रस्ताव सादर झालेला होता. यानुसार आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेल्हे तालुक्याचे राजगड असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.