मराठा आरक्षण : राहाता शहर व तालुक्यातील गावांत बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha Reservation : मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस उलटूनही सरकारने यावर निर्णय न घेतल्याने सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज सोमवारी राहाता शहर व तालुक्यातील अनेक गावांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राहाता तालुका व शहर बंदची हाक दिली आहे. शहरासह अनेक गावे बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती भाऊसाहेब सदाफळ यांनी दिली आहे.

याबाबत पत्रकात सदाफळ म्हणाले, की मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राहाता शहर बंद ठेवण्याचे आवाहन शहरातील मुख्य चौकातील फलकाद्वारे व्यापाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे. याबाबत सोशल मीडियावरसुद्धा आवाहन करून व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जरांगे यांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घ्यावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा यापुढे समाज बांधव मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील, असा इशाराही बांधवांनी दिला आहे.

जरांगे हे पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत; परंतु सरकार अजून दखल घेताना दिसत नाही. त्यांच्या समर्थनार्थ व त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने शिर्डी येथे तीन-चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.

या उपोषणालाही अनेक गावातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी, पदाधिकारी, मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने वेळीच दखल घेतली नाही, तर दि. १ नोव्हेंबरपासून राहता शहरातील वीरभद्र मंदिर प्रांगणासमोर सकल

मराठा समाज बांधव आमरण उपोषणास बसणार असल्याचे यावेळी सदाफळ यांनी सांगितले. यावेळी विरेश बोठे, भाऊसाहेब सदाफळ, महेश सदाफळ, दत्तात्रय सदाफळ, योगेश डांगे, सागर बोठे, अनिल बोठे रवींद्र सदाफळ, अनिल बोठे आदी उपस्थित होते.