Ahmednagar Politics : रामदास आठवलेंचं ठरलं काय? शिर्डीच्या फेऱ्या वाढल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. अलीकडेच ते या भागात येऊन गेले.

आता सोमवारी (११ एप्रिल) ते पुन्हा श्रीरामपुरात येत आहेत. तेथे आठवले आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पक्षाचा संकल्प मेळावा होत आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले विखे पाटील यांना रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन आठवले यांचे या भागातील दौरे आणि विखे पाटलांशी सलगी वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ २०२६ पर्यंत अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यानंतर पुन्हा मतदारसंघ फेररचना आयोगाची स्थापना होऊन यात बदल होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कदाचित मतदारसंघ राखीव असण्याची ही शेवटची निवडणूक असणार आहे. मागीलवेळी विखे पाटील यांनी राजकीय खुन्नस देत ऐनवेळी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची जबाबदारी घेत त्यांना निवडून आणले.

पुढे सेना भाजपमध्ये वितुष्ट आले. ही संधी साधून आठवले यांची या मतदारसंघावर पुन्हा नजर असल्याचे सांगण्यात येते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत आठवले यांचा शिर्डी मतदारसंघातून पराभव झाला होता.

आठवलेंच्या मनात त्या पराभवाचे शल्य कायम आहे. त्यावेळी झालेल्या अॅट्रोसिटीच्या अपप्रचाराचा फटकाही आपल्याला बसल्याचे आठवले नेहमी सांगतात.

यावरून त्यांनी पूर्वी विखे पाटील यांच्यावर आरोपही केले होते. यावेळी दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी बदललेली आहे. त्यामुळे आठवले यांना आता विजयाची गणिते सोपी वाटू लागल्याने आणि विशेष म्हणजे आता विखे पाटील यांचाही त्यांना भक्कम पाठिंबा मिळणार असल्याने त्यांनी आतापासून या भागात दौरे करून तयारी सुरू केल्याचे दिसून येते.