Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी पर्यटकांत फेमस ! पावसाचा जोर कायम असल्याने धरण भरले इतके…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rain : अहमदनगरची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असून घाटघर येथे पाच इंच व रतनवाडीला साडेपाच इंच पावसाची नोंद झाली आहे.

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसुन आली. भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे. अकोले तालुक्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर व रतनवाडी येथे पावसाचा जोर टिकून असुन पावसाची संततधार कोसळत आहे.

त्यामुळे नदीनाले ओसंडुन वाहत असुन वाहणारे पाणी भंडारदरा धरणाला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात नविन पाण्याची आवक सुरु आहे. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८५४० दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरण ७७ टक्के भरले आहे.

२४ तासांमध्ये भंडारदरा धरणामध्ये ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले. ७१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर झाला. दरवर्षी भंडारदरा धरण १५ ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा आहे. यावर्षी घाटघर व रतनवाडी वगळता बाकी धरण पाणलोटात पावसाचा जोर कमी असल्याने धरण भरण्याची परंपरा मोडीत निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भंडारदरा म्हणजे अहमदनगर जिल्ह्याची पर्यटनाची पंढरी समजली जाते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाळी पर्यटन बंद करण्यात आल्याने भंडारदऱ्याला पर्यटकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

त्यामुळे भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. सलग दोन दिवस सुट्टी आल्यामुळे शनिवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले दिसुन आले. भंडारदरा धरणाच्या काठावर पाणी बघण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. धरण पाणलोटात असलेल्या धबधब्यांना पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली.