सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असल्याचे भासवत तरुणांना फसविणाऱ्या तोतयाला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे.

नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्ह्यात एक व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे भासवून युवकांना लष्करात भरती करतो असं सांगत फसवणूक करत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलीस पथकाने कारवाई सुरु केली. यासाठी लष्कराच्या गुप्तचर विभागाचीही मदत घेण्यात आली. हा व्यक्ती सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असे लिहिलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरत असे.

शनिवारी हा व्यक्ती संगमनेर तालुक्यातील मांडवा गावाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले आणि त्याची चौकशी केली असता

त्याने आपले नाव नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाडी, पोस्ट म्हंसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं सांगितलं. आरोपीने बंगळुरु, कर्नाटक येथे लेफ्टनंट पदावर नोकरीला असल्याचंही सांगितलं.

तसं ओळखपत्रही त्याने दाखवलं. त्याआधारे लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाकडे चौकशी केली असता असा कोणीही अधिकारी तेथे नोकरीला नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे हा तोतया असल्याची पोलिसांना खात्री पटली. आपण लष्करी अधिकारी असल्याचे खोटे सांगून युवकांना फसवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

त्याच्याकडून अर्ज, छापील नियुक्ती पत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर बनावट साहित्य मिळून आले. त्याने अनेक युवकांची सुमारे ८ लाख रुपयांची फसवणूक केली. राहुरी पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.