अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणात फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसलेला पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद गावच्या हद्दीत ताब्यात घेतले आहे.

सालपे गावच्या परिसरात असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये मनोहर मामा भोसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शुक्रवारी (दि १०) दुपारी तीनच्या सुमारास ताब्यात घेतले. हे फार्म हाऊस कोणाच्या मालकीचे आहे, याची माहिती पोलिस घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती ता बारामती जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांचे वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.

तक्रारदार यांच्या वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून औषध, तसेच चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये घेऊन फसवणूक केली आहे. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरु होता. आज आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगांव ता. करमाळा जि.सोलापुर)यास ताब्यात घेण्यात यश आले आहे. त्याला बारामती तालुका पोलीस ठाण्यात आणत अटक केली जाणार आहे.

उर्वरीत विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा , ओंकार शिंदे हे दोघे आरोपी फरारी आहेत. फरारी आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल, त्यांच्या मागावर पोलीस पथके असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.