एमआयडीसी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरात एका ४४ वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली आहे.

सह्याद्री चौकातील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या आवारात सदर मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटविली असून त्याचे नाव बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळके (वय ४४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे आहे.

मयत शेळके हा कोपरगाव पंचायत समितीत लिपिक म्हणून कार्यरत होता मात्र काही दिवसांपूर्वी त्यास सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले होते, असे पोलिसांनी सांगितले.

एमआयडीसी परिसरात सह्याद्री चौकात बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात एक मृतदेह सकाळी आढळून आला. त्यामुळे काही नागरिकांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी हे फौज फाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता प्रथमदर्शनी पाहता हा खून दगडाने ठेचून केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

पोलिसांनी या मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता तो गजानन कॉलनी येथील बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळके याचा असल्याचे समोर आले असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटना स्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

एमआयडीसी परिसरात अशा प्रकारे खून होण्याची गेल्या अडीच महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ डिसेंबर २०२३ रोजी रात्री एमआयडीसी परिसरात असलेल्या प्लॉट नं एफ ७१ च्या पाठीमागील मोकळ्या जागेत ओमप्रकाश रामबच्चन महतो (वय ३५, रा. शिवालय कंपनी, दत्त मंदिरासमोर, एमआयडीसी, मूळ रा. बिहार) या कामगाराचा खून झाला होता, दारू पिताना झालेल्या वादातून हा खून झाल्याचे काही दिवसांनी पोलिस तपासात समोर आले होते.

आता पुन्हा एक खून झाला असून तो कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.