Prajakt Tanpure : पाईपलाईनच्या कामात भाजपा कार्यकर्त्यांचा खोडा ! मतदारसंघात एकच खळबळ…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Prajakt Tanpure : भाजप कार्यकत्यांच्या आडमुठेपणामुळेच मिरी-तिसगाव व ४० गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या एक्सप्रेस फिडरचे काम ऐन दुष्काळी परिस्थितीत खोळंबल्याचा आरोप माजी राज्यमंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

नेहमीच संयमाची भूमिका घेणारे आणि अधिकाऱ्यांशीदेखील आदरपूर्वक संवाद साधणारे आमदार तनपुरे यांनी अहमदनगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्ह्याच्या टंचाई आढावा बैठकीत आपली भूमिका व्यक्त करताना निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे प्रामुख्याने प्रशासनाचे लक्ष वेधले.

या वेळी आ. तनपुरे म्हणाले, पाथर्डी तालुक्यात भाजपाचेच काही कार्यकर्ते पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काही अपेक्षेने सुरू असलेल्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावाजवळून तिसगावसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्यासाठी एक्सप्रेस लाईन टाकली जाणार आहे. चिचोंडी गावाजवळ सुरू असलेल्या कामात भाजपच्या कार्यकर्त्यांनेच अडथळा निर्माण करून या कामात खोडा घालण्याचे काम केल्यास तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल.

गेल्या अनेक वर्षापासून तिसगाव ग्रामस्थ पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू असून, यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

आपण निश्चितपणे तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत. मात्र, सत्ताधारी गटाचे काही कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी ठेकेदाराची अडवणूक करत असतील तर हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.

दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री बैठक घेऊन पाणीटंचाईवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते पाईपलाईनच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे.

त्यामुळे एक्सप्रेस लाईनचे काम पोलीस बंदोबस्तात विनाअडथळा पूर्ण करण्याची गरज असल्याचे आ. तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.