अभिमानास्पद ! अहमदनगरमधील ‘पूनम’ आता ‘युपी’ वॉरियर्सकडून खेळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा देशाच्या नकाशावर नेहमीच उजागर राहिला आहे. ऐतिहासिक कामगिरी असो, की सांस्कृतिक अहमदनगरचे नाव नेहमीच उज्वल राहिले आहे. नुकतेच नाट्य व फिल्मी दुनियेत देखील

अहमदनगरच्या मुलींनी स्थान मिळवल आहे. आता अहमदनगरच्या शिरपेचात देखील आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अहमदनगरची क्रिकेटपटू पूनम खेमनर हिने क्रिकेटविश्वात अहमदनगरचे नाव चमकवले आहे. ती आता महिला प्रीमिअर लीगमध्ये युपी वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून ती खेळली होती. विशेष म्हणजे तिला यूपी वॉरियर्स संघाने १० लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले आहे.

संगमनेरच्या पुनमचा असा सुरु झाला प्रवास

पूनम ही आश्वी (ता. संगमनेर) येथील रहिवासी. २०१७-१८ मध्ये पुणे विद्यापीठाकडून खेळताना तिने विभागीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेतून तिची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत निवड झाली. त्यानंतर तिने महाराष्ट्र संघाकडून अष्टपैलू म्हणून दमदार खेळ केला.

पुढे तिला गुजरात राज्याने निमंत्रित केले. गुजरातकडून खेळतानाही ती उत्कृष्ट खेळली. नागालँड राज्याने तिला विशेष निमंत्रित म्हणून नागालँड संघाकडून खेळण्याची संधी दिली. यात तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सध्या ती मध्यप्रदेश संघाकडून खेळत आहे. आता ती महिला प्रीमिअर लीगमध्ये युपी वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे.

 अहमदनगरच्या कन्येला ‘बहू’मान

महाराष्ट्र, गुजरात, नागालँड व आता मध्यप्रदेश संघाकडून खेळणारी पूनम जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. तसेच महिला प्रीमिअर लीग खेळणारीही ती जिल्ह्यातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. क्रिकेट स्पर्धेतील अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून पूनम हिचे नाव स्थानिक क्रिकेट क्षेत्रात आदराने घेतले जाते. तिच्या दर्जेदार खेळाची दखल घेत उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांनीही तिचा गौरव केला आहे.