आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शेतीला बारमाही पाणी मिळावे यासाठी सरकारने विहीरींसाठी चार लाख रुपये अनुदान देते. कर्जत जामखेड तालुका दुष्काळी असल्याने चार ते पाच हजार शेतकऱ्यांनी विहीरीचे प्रस्ताव दाखल केले.

त्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळाली. पण होळीच्या दिवशी आ. प्रा.राम शिंदे व आ. रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विहिरींची चौकशी कोणी लावली यावर सोशल वॉर सुरू आहे.

तालुक्याची दुष्काळी ओळख मिटवण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विहिरींना मंजुरी मिळाली. मात्र आता या विहिरीच राजकीय श्रेयवादात सापडल्या आहेत.

भाजपवाले आ. रोहीत पवार यांच्यावर आरोप करतात तर राष्ट्रवादीवाले आ. राम शिंदे वर आरोप करतात. या आरोप, प्रत्यारोपामुळे मंजूर विहिरी धारक शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत. कर्जत जामखेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर विहिरी मंजूर झाल्या आहेत.

गावोगावी असलेली राजकीय स्पर्धा, कोणी कशी विहीर मिळवली, जुन्या विहिरी दाखवून बिल कसे काढण्यात आले याबाबत सर्रास चर्चा पंचायत समितीच्या आवारात व आसपास चहाच्या ठिकाणी होत आहेत. तसेच अनेकजण हातात फायली घेऊन पंचायत समितीत फिरत आहेत.

त्यामुळे विहिरीच्या प्रस्तावाला ग्रहण लागले आहे. या विहीर प्रस्तावाची चौकशी आता लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणतात आ.राम शिंदे यांनीच चौकशी लावली. आ. रोहीत पवार यांनी ग्रामीण भागात गावोगाव विहिरींचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघातील ३ हजारपेक्षा जास्त लोकांच्या विहिरींचे प्रस्ताव मंजूर करुन घेतले. तर आ. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेड तालुक्यात आ. राम शिंदे यांनी साडेचार हजार विहीर मंजूर करून आणल्या त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ झाला.

या आरोप प्रत्यारोपामुळे मात्र जनतेची करमणूक होत आहे, तर लाभार्थी विहीरधारक मात्र प्रस्ताव मंजूर करेपर्यंत जो खर्च झाला त्यामुळे ते त्रस्त आहेत. दुष्काळात झालेला खर्च कसा वसूल करायचा यावर ते चिंतेत आहेत