मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात दोन मार्काने आरक्षणामुळे नंबर हुकला, त्यामुळे नैराश्य आल्याने २० वर्षीय कबड्डीपटू ओम मोहन मोरे या तरुणाने प्रवरा संगम येथे पुलावरून गोदावरी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी (दि.१२) मार्च रोजी रात्री ८ वाजता ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओम छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्याचे वडील एका खाजगी कंपनीमध्ये चालक आहे. त्याच्या कुटुंबात आई व लहान भाऊ देखील आहे.

ओम याच्या ऐवजी इतर मागासप्रवर्गातील स्पर्धकाची आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात निवड झाली. त्यामुळे नैराश्यातून प्रवरा संगम येथे गोदावरी नदी पात्रात मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास उडी मारून त्याने आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्याने घरच्या मोबाईलवर रात्री ७.१५ वाजेच्या दरम्यान, आईला उद्देशून ‘आय मिस यु ममा’, ‘आय मिस यु जय’, ‘आय मिस यु पपा’ असा संदेश लिहून पाठविला. तसेच मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. असाही मेसेज पाठवला आहे.

हे रात्री ८ वाजता त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. पोलिसांना त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन प्रवरा संगम येथील गोदावरी पुलाजवळ मिळाले. पोलिसांनी अधिक तपास केला असता, ओमची मोटरसायकल प्रवरा संगम पुलावर मिळून आली.

पोलिसांनी रात्रीच तपास सुरू केला होता. काल बुधवारी (दि.१३) मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास नेवासा हद्दीमध्ये नदीपात्रात ओमचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर ओमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस.जी. ससाणे, हे.कॉ. बर्डे, माने, राम वैद्य यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी मराठा आंदोलक अॅड. के. एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, राजू उंदरे, सरपंच दादा निपुंगे, संभाजी सोनवणे, प्रकाश निपुंगे आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी गेलेला योद्धा म्हणजे काकासाहेब शिंदे यांनी २३ जुलै २०१८ मध्ये आरक्षणासाठी प्रवरा नदीवरील याच पुलावरून नदीपात्रात आत्महत्या केली होती. त्यानंतर आता ओम याने याच ठिकाणी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.